औरंगाबादकरांना कर भरणे होणार सोप्पे

लवकरच 75 ठिकाणी किऑस्क मशिन
औरंगाबादकरांना कर भरणे होणार सोप्पे

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबादकरांना मालमत्ता कर भरणे सोपे व्हावे यासाठी किऑस्क मशिन (Kiosk machine) उभारण्याचा निर्णय महापालिकेने (Municipal Corporation) घेतला आहे. शहरात 75 ठिकाणी ही मशिन लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्यास त्यांना कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही, असे सांगितले जात आहे.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेचे प्रशासन दरवर्षी प्राधान्य देत असते; पण नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कर आकारणीमधील त्रुटी, कर वसुलीच्या प्रक्रियेतील उणीवा यामुळे नागरिक कर भरण्यासाठी पालिकेच्या दारात येत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून सुमारे 450 कोटी रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी शहरातील नागरिकांकडे आहे. त्याशिवाय चालू वर्षाच्या मालमत्ता कराची मागणी 200 कोटी रुपये आहे. यंदा करोनाची स्थिती लवकर नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने कर वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेत तीन उपायुक्त आहेत आणि नऊ झोन कार्यालये आहेत. कर वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी पालिका प्रशासकांनी एका उपायुक्ताकडे तीन झोन कार्यालयाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जास्तीत जास्त कर वसूल होईल ,असा प्रशासनाला विश्वास आहे. महापालिकेच्या लेखी दोन लाख 73 हजार मालमत्तांची नोंद आहे, तर अधिकृत नळांची संख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. पालिकेच्या रेकॉर्डवर असलेल्या मालमत्ता व नळांचा कर वसुल करण्याच्या दृष्टीने यंदा पालिकेने क्युऑक्स मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या कर आकारणी विभागातून ही माहिती मिळाली आहे.

कर भरण्यासाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागते, अनेकवेळा सॉफ्टवेअरची समस्या निर्माण होते. सर्व्हर डाउन झाल्यामुळे अनेकवेळा कर न भरताच परतावे लागते. या समस्यांची दखल घेत शहरात 75 ठिकाणी किऑस्क मशिन लावण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या जवळच्या ठिकाणी जावून मशीनच्या सहाय्याने कर भरता येणार आहे. रांगेत उभे राहण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

महापालिकेची सर्व झोन कार्यालये, पालिकेचे मुख्यालय, विविध सरकारी कार्यालये, प्रमुख दवाखाने, बँका, न्यायालय या ठिकाणी किऑस्क मशीन बसवण्याचे नियोजन केले जात आहे. दिवाळीच्या दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पालिकेकडे नोंद असलेल्या मालमत्तांची संख्या - 2 लाख 73 हजार

अधिकृत नळ कनेक्शनची संख्या - सुमारे सव्वा लाख

मालमत्ता कराची थकबाकी - 400 कोटी रुपये

मालमत्ता कराची चालू वर्षाची मागणी - 200 कोटी रुपये

पालिकेचे तीन उपायुक्त- कर वसुलीसाठी एका उपायुक्ताकडे तीन झोन कार्यालयांची जबाबदारी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com