फायर सेफ्टी बसवले, पण प्रशिक्षणच नाही!

फायर सेफ्टी बसवले, पण प्रशिक्षणच नाही!

फायर सेफ्टी यंत्रणेचे ऑडिट सुरू

औरंगाबाद - Aurangabad

विरार येथील रुग्णालयामधील आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सोमवारपासून शहरातील रुग्णालयांची फायर सेफ्टी यंत्रणेचे ऑडिट सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी केलेल्या चार रुग्णालयांच्या तपासणीत फायर सेफ्टी यंत्रणा बसवली, मात्र ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षणच तेथील कर्मचार्‍यांना नसल्याचा धक्कादायक प्रकार पथकाच्या निदर्शनास आला. त्यामुळे अग्निशमन विभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांनी अशा रुग्णालयांत त्यांच्या मागणीवरून तेथील कर्मचार्‍यांना फायर सेफ्टी यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले.

मागील आठवड्यात नाशिक व विरार येथील सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीत अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिटसाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. हे पथक रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करणार आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील 56 रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. सोमवारपासून या तपासणीस अग्निशमन विभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांच्या नेतृत्वात सुरूवात करण्यात आली. शहरातील चार रुग्णालयांची पथकाने तपासणी केली. त्यात संबंधित रुग्णालयातील कर्मचार्‍यांना फायर सेफ्टीची यंत्रणा कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण नसल्याचे समोर आले. त्यावर संबंधित रुग्णालयांना प्रशिक्षणासाठी अग्निशमन विभागाला पत्र पाठवण्याची सूचना पथकाने केली. पत्र प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांतील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आर.के. सुरे यांनी दिली.

शहरातील रुग्णालयांची संख्या

१)मनपाचे कोविड सेंटर 18

२) शासकीय कोविड सेंटर 03

३) खासगी कोविड सेंटर 58

४)मनपा आरोग्य केंद्र 39

५) सर्व खासगी रुग्णालये 600

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com