पारा घसरला ; औरंगाबादमध्ये 'महाबळेश्वर'चा फील!

पारा घसरला ; औरंगाबादमध्ये 'महाबळेश्वर'चा फील!

औरंगाबाद - aurangabad

दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात थंडीचा (Cold) कडाका चांगलाच वाढला असून तापमान १२ अंशापर्यंत गेले आहे. हिल स्टेशन (Mahabaleshwar) महाबळेश्वरचा फील या कडाक्याच्या थंडीमुळे मिळत आहे. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मफलर, कानटोपी अशा उबदार कपड्यांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपासून थंडी तसेच ढगाळ वातावरणामुळे शहरभर सर्दी, खोकला, तापेसह श्वसनविकारांचे रुग्ण वाढले आहेत. मात्र याच रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर फार कमी किंवा नगण्य प्रमाणात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे शहरातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुरेपूर काळजी घ्या, पण काळजी करू नका आणि थंडीपासून बचाव करा, कोमट पाणी प्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ओमिक्रॉनच्या सावटाखाली नवीन वर्ष उजाडत असतानाच, काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व थंडीने पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत आणि बहुतांश क्लिनिक व रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात हेच रुग्ण सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहेत. बच्चे कंपनीही बेजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेकर म्हणाले, 'सध्या सर्वच वयाच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप दिसून येत आहे. दमा, श्वसनविकार व ऍलर्जीचे रुग्णही लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे जाणवत आहे. विशेषत: हिवाळा हा भलेही 'हेल्दी सीझन' म्हटला जातो; पण सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बालकांना बसत आहे.' प्रौढांमध्ये याच प्रकारचे रुग्ण दिसून येत असून सर्दी, खोकला, तापेसह दमा, ब्राँकायटिस, सीओपीडीच्या रुग्णांचा आजार बळावल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

जॅकेट्सना मागणी

बाजारात स्वेटर, शाल, कानटोपी या उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात हळूहळू गर्दी वाढताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडीपासून संरक्षण करणारे तिबेटियन स्वेटर उपलब्ध झाले आहेत. गुलाबी, आकाशी, लाल असे विविध रंगांतील स्वेटर आकर्षक डिझाइनमध्ये पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

स्वेटर्ससोबत लोकरीचे मऊ असे स्टोल्स, जॅकेट, कानपट्टी, टोपी यांनाही सध्या मोठी मागणी आहे. फॅन्सी आणि स्टायलिश स्वेटर खरेदी करण्याकडे तरुणांचा कल आहे, तर महिलावर्ग मात्र जिन्स आणि पंजाबी सुटवर वेगवेगळ्या स्टाइलचे स्वेटर खरेदी करत आहेत. शहरात १०० पेक्षा जास्त तिबेटियन स्वेटर्स विक्रेते आहेत.

Related Stories

No stories found.