मनपाची अ‍ॅबेटिंग मोहीम नावापुरतीच

46 जण डेंग्यू पॉझिटिव्ह
मनपाची अ‍ॅबेटिंग मोहीम नावापुरतीच

औरंगाबाद - Aurangabad

मागील तीन महिन्यांपासून औरंगाबाद शहरात (corona) कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे याच तीन महिन्यात (Dengue) डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. जुलै महिन्यापासून शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याचे महापालिकेकडील प्राप्‍त आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, मागील वीस दिवसांतच शहरात तब्बल 46 जणांच्या चाचणीचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

दर वर्षाआड औरंगाबाद शहरात डेंग्यूची साथ जोर धरत असल्याचे आजवरच्या प्राप्‍त आकडेवारीवरून समोर आले आहे. सोबतच चिकन गुणियाचेही अधिक संख्येने रुग्ण आढळत आहेत. तापेचे रोजचे दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण शहरातील विविध दवाखान्यांत तपासणीसाठी येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेकडून अ‍ॅबेटिंगची विशेष मोहीम राबवली जाते. मात्र ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यात शहरात डासांची उत्पत्ती वाढलेली असून त्यातूनच डेंग्यूसह तापीच्या आजाराचे रुग्ण वाढत असावेत, असा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे. तथापि, पालिकेकडून प्राप्‍त आकडेवारीनुसार औरंगाबाद शहरात जुलै महिन्यापासून डेंग्यूची साथ जोर धरताना दिसत आहे. मात्र जुलैपर्यंत शहरात डेंग्यूचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. या महिन्यात 47 रुग्ण हे डेंग्यूसदृश आढळले. ऑगस्ट महिन्यात यात दुपटीने वाढ होवून एकूण 98 संशयित आढळले. तर 9 रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले. सप्टेंबर महिन्यात मात्र संशयितांचा आकडा कमी होवून डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मागील वीस दिवसांतच 55 वर पोहचला. 1 ते 20 सप्टेंबर दरम्यान शहरात तब्बल 46 जणांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य यंत्रणेला हादरा बसला आहे.

डेंग्यूसह साथरोग प्रतिबंधासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आता उशीराने विशेष अ‍ॅबेटिंग मोहीम हाती घेतली आहे. मात्र ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाताना दिसत नाही. पालिकेकडून ही मोहीम राबवली जात असल्याची आकडेवारी मात्र रोज जाहीर केली जात असून या आकडेवारीवरच संशय व्यक्‍त केला जात आहे. दाट लोकवस्ती, स्लम एरिया, गुंठेवारीसह मागासलेल्या भागांत आजही ही मोहीम पोहचलेली नाही. त्यामुळेच डेंग्यूच्या रुग्णांत गतीने वाढ होताना दिसत आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान शहरात डेंग्यूचे 64 संशयित तर 10 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते. यंदा मात्र यात साडेआठ महिन्यातच लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा आजवर 55 डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले असून संशयितांची संख्या 237 एवढी आहे. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांतच डेंग्यूचा शहरात गतीने फैलाव होताना दिसत आहे.

चार वर्षांतील डेंग्यूचा अहवाल

वर्षे पॉझिटिव्ह

2018 72

2019 247

2020 10

2021 55

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com