मराठवाड्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला

मराठवाड्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला

अतितीव्र पावसाची शक्यता

औरंगाबाद- (Aurangabad) -

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Hurricane) राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे. राज्यात दोन दिवस अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यात (Marathwada) काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावात तीन कुटुंब अडकून पडले आहेत.

गुलाब चक्रीवादळाचा जमिनीवर येण्याचा प्रवास संध्याकाळी उशिरा सुरू झाल्यानंतर रविवारी रात्री ११.३० वाजता जमिनीवर पूर्णपणे धडकल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. जमिनीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली; मात्र सोमवारी त्याचा प्रवास पश्चिमेकडे होत राहिला. त्यामध्ये त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामध्ये झाले. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पश्चिम किनारपट्टीवर पाऊस अधिक तीव्र असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसंच, उस्मानाबादमधील मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरले आहे. त्यामुळं धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळं मांजरा धरणाचे पाणी मांजरा नदीत सोडण्यात आले आहे.

२७ सप्टेंबरच्या मध्यरात्री जोरदार पाऊस (Heavy rain) झाला. त्यामुळे मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढली, धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून मोठा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. वाकडी (शि) परिसरात पाणी शिरले आणि काही वेळात परिसर पाण्याखाली गेला. शेतात राहणारे प्रसाद सोमासे, उद्धव शिंदे, रामराव शिंदे यांच्या घराला प्रचंड पाण्याने वेढा घातला असून तीन कुटुंबातील १७ जण व जनावरे अडकली. हे लोक भीतीने मध्यरात्री घराच्या स्लॅबवर जाऊन थांबले. ही माहिती कळताच तहसीलदार विद्या शिंदे, शिराढोण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेटके व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा विळखा वाढलेला असल्यामुळे त्यांना काढण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प या सततच्या पावसामुळे पूर्ण भरले असून निम्न तेरणा धरण आणि सिना कोळेगाव धरण पूर्ण भरले मुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे मांजरा धरण यापूर्वीच भरला असून मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग होत असताना नदीकाठच्या बॅक एरिया खाली येणाऱ्या गावांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तर, कळंब तालुक्यातील वाकडी, लासरा येथेही पुराचे पाणी शिरले आहे. वाकडी कळंब येथे छतावर १७ लोक अडकले आहेत. तर ग्रामस्थांनी पशुधन सोडून दिले आहे.

रस्ता वाहून गेला

बीड जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसाने बीड परळी बीड अंबाजोगाई रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रस्ता काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडले असून ७०८४५ घनफुट प्रतिसेकंद विसर्गाने पाणी मांजरा नदीत सोडले जाणार आहे.

Related Stories

No stories found.