टँकर पाहिजे तर करा ऑनलाईन बुकिंग!

औरंगाबाद महापालिकेचा उपक्रम
टँकर पाहिजे तर करा ऑनलाईन बुकिंग!

औरंगाबाद - aurangabad

शहरातील पाणी टंचाईवर (Water scarcity) मात करण्यासाठी महापालिकेतर्फे (Municipal Corporation) विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातीलच एक उपाययोजना म्हणजे टँकरसाठी आता ऑनलाइन बुकिंगची (Online booking) पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यासाठी लवकरच यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शहरात पाणीटंचाई देखील सुरू झाली. अनेक भागात कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असून आठवड्यातून एकदाच येणारे पाणी पुरेसे ठरत नसल्याने टँकरवर असंख्य कुटुंबांना अवलंबून राहायला लागत आहे. प्रामुख्याने सिडको-हडको भागात टंचाईची समस्या सध्या गंभीर झाली आहे.

पालिकेच्या माध्यमातून चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो, परंतु सिडको-हडको भागातील काही वसाहतींना सातव्या, आठव्या दिवशी पाणी मिळते. त्यामुळे या वसाहतींमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. या नागरिकांनी विविध पक्ष-संघटनांच्या माध्यमातून आंदोलन केले, परंतु स्थिती अद्याप सुधारलेली नाही.

पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दोन दिवसांपूर्वी सिडको एन- ५ येथील जलकुंभाला भेट दिली व तेथील कामकाजाची झाडाझडती घेतली. टँकरच्या संदर्भात काही गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आले. टँकर भरण्यासाठीचा जो पॉइंट आहे तो गळका असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. जे टँकर या ठिकाणाहून भरले जात होते त्यांच्या बद्दलही संशय घेण्यासारखी स्थिती होती. महापालिकेचे टँकर आहेत की, खासगी टँकर आहेत असा प्रश्न निर्माण झाला होता. टँकर भरण्यासाठी घेतले जाणारे शुल्कदेखील चर्चेचा विषय ठरला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासक पांडेय (Administrator Pandey) यांनी टँकरचे ऑनलाइन बुकिंग करण्याची कल्पना मांडली आहे. येत्या काही दिवसांत ती प्रत्यक्षात येईल असे त्यांनी सांगितले. टँकरसाठीचे शुल्क नागरिकांना ऑनलाईन भरता येईल. शुल्क भरल्यावर नागरिकांना ऑनलाइन पावती मिळेल.

त्या पावतीवर पत्ता असल्यामुळे टँकर नागरिकांच्या घरापर्यंत येईल. सध्या नागरिकांना टँकरसाठीचे पैसे भरण्यासाठी एकतर जलकुंभावर जावे लागते किंवा सिडको एन- ७ येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागते. ऑनलाइनमुळे नागरिकांचा हा फेरफटका वाचणार आहे. प्रत्येक टँकरला जीपीएस आणि व्हिटीएस (व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम) बसवली जाणार आहे. त्याचे नियंत्रण स्मार्ट सिटी कार्यालयाच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये असणार आहे. त्यामुळे पाण्याचे भरलेला टँकर जलकुंभावरुन केव्हा निघाला आणि नागरिकाच्या घरापर्यंत केव्हा पोहोचला हे कळणे सोपे होणार आहे.

Related Stories

No stories found.