राज्य क्रीडा महोत्सवाचे थाटात उदघाटन

jalgaon-digital
3 Min Read

औरंगाबाद – aurangabad

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दोन हजार खेळाडूंच्या (player) उपस्थितीने रंगणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाचे (Sports festival) उद्घाटन थाटात करण्यात आले. राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती व हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीने हा सोहळा नेत्रदीपक ठरला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर हा सोहळा झाला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते मशाल पेटवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. मा.कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन, प्रख्यात खेळाडू धनराज पिल्ले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, राजभवन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक माने, सदस्य डॉ. दिनेश पाटील, डॉ. मोहन अमरुळे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच तुळजापूर-औरंगाबादला आलेल्या मशालीने क्रीडा महोत्सवाची दीप प्रज्वलित करण्यात आली.

राज्यभवनच्या वतीने आयोजित या महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स या पाच प्रकारात स्पर्धा रंगणार आहेत. यामध्ये राज्यातील २२ विद्यापीठाचे २ हजार १२० खेळाडू (१ हजार ११७ मुले),(१ हजार ३ मुली) तसेच ३०२ प्रशिक्षक (पुरुष २६८ व महिला ३४) सहभागी झाले आहेत. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत तसेच खेळाडूंचे पथसंचलन करण्यात आले. कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी प्रास्ताविकात आयोजनामागची भूमिका मांडली. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचलन तर संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी आभार मानले.

क्रीडा विद्यापीठ औरंबाबादलाच हवे : डॉ.भागवत कराड

मराठवाड्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यात राज्य क्रीडा विद्यापीठावर हक्क असून राज्य शासनाने औरंगाबादेत राज्य क्रीडा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असे मा.केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड म्हणाले. यापुर्वीच्या सरकारने औरंगाबादजवळ करोडीजवळ जागा उपलब्ध असतांनाही आमचे हक्काचे विद्यापीठ पळविले. आता ते पुनःश्च औरंगाबादला झाले पाहिजे तसेच ’साई’मध्ये विद्यापीठातील खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही डॉ. कराड म्हणाले.

खेळाडूंना चांगले दिवस : गिरीश महाजन

सर्वच प्रकारच्या खेळांना केंद्र व राज्यस्तरावरुन मोठे आर्थिक सहकार्य, पाठबळ मिळत आहे. तसेच खेळाडूंना मिळणारे मानधन, पारितोषिके याची रक्कम वाढविली आहे. पुर्वीच्या तुलनेत खेळाडूंना आता चांगले दिवस आले आहेत, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

पॅशन, डेडिकेशन, हार्डवर्क करा : धनराज पिल्ले
कोणत्याही खेळात विजेतेपद पटकावयाचे असेल तर खेळाडूकडे ’पॅशन, डेडीकेशन व हार्डवर्क’ या त्रिसूत्रीची आवश्यकता आहे, असे प्रख्यात हॉकीपट्टृ धनराज पिल्ले यांनी केले.

क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न : कुलगुरु
क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवस विद्यापीठ परिसर क्रीडामय झाला आहे. कला व क्रीडा या दोन्ही क्षेत्राला भरीव तरतूद करुन विद्यापीठात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न आहे, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षीय समारोपात म्हणाले.

या सोहळयात धर्मवीर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उस्मानाबाद उपपरिसरच्या कलावंतानी जिजाऊ कोलते हीने नृत्य तर नाट्यशास्त्र विभागाच्या संघाने आदिवासी नृत्य सादर केले. डॉ. गणेश शिंदे, डॉ. अशोक बंडगर, विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले. २२ विद्यापीठाच्या खेळाडूंनी पथसंचलन केले. सर्व संघाचे नेतृत्व विद्यार्थींनी केले. यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने फेटे, ट्रॅकसूट वर संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *