औरंगाबादेत दुसऱ्या डोससाठी सवलत द्या!

रिक्षाचालकांची मागणी
औरंगाबादेत दुसऱ्या डोससाठी सवलत द्या!

औरंगाबाद - aurangabad

आरटीओ (rto office) कार्यालयात लसीकरण (Vaccination) सक्तीचे करण्यात आलेले आहे. या सक्तीमुळे रिक्षाचालक अडचणीत आलेले आहेत. एक लस घेतलेल्या रिक्षाचालकांनाही आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामे करता येत नाहीत. या प्रकरणात रिक्षाचालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) धाव घेतली असून, लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी कालावधीची सवलत देण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक संघटनेने याबद्दल प्रसिद्धी पत्रक दिले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सदर कामे करून घेणाऱ्यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक केले आहे. लसीकरण असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाही.

जिल्हाधिकारी यांनी लसीकरणासाठी सक्ती केल्यानंतर, शहरातील रिक्षाचालकांनीही लस घेण्यास सुरुवात केली. शहरात अनेक रिक्षाचालकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या रिक्षाचालकांना ८७ दिवसानंतर लशीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. यामुळे महिन्याभर आधी लस घेतलेल्या रिक्षाचालकाला दुसरी लस घेता येत नाही. हा केंद्र सरकारचाच नियम आहे. यामुळे ज्या रिक्षाचालकांना रिक्षाचे पासिंग करायचे आहे किंवा फिटनेस प्रमाणपत्र घ्यायचे आहे, त्यांना एक लस घेतल्यानंतरही आरटीओत त्यांची कामे करता येत नाहीत.

आरटीओच्या या नियमाबाबत रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला. त्यांना ही अडचण सांगितली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वेळेत रिक्षांची आरटीओ कार्यालयाशी संबंधीत कामे झाली नाही. तर आरटीओ कार्यालयाकडून दंड लावण्यात येणार आहे. यामुळे दंडाचा फटका टाळण्यासाठी ही सवलत देण्याची मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com