फॉरेन गिफ्ट पडले २१ लाखांना ; आरोपी जेरबंद 

फॉरेन गिफ्ट पडले २१ लाखांना ; आरोपी जेरबंद 

औरंगाबाद - aurangabad

फेसबुकवर (Facebook) ओळख वाढवल्यानंतर महिलेला (Foreign Jewelry) फॉरेनची ज्वेलरी, शुज, मोबाइल (Mobile) आणि पौंड करन्सी हे गिफ्ट म्हणून पाठविल्याचे आमिष दाखवून एका स्थानिक महिलेला तब्बल २१ लाख ५० हजार ३५५ रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका आरोपीला २१ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या. त्याला २९ एप्रिलपर्यंत (police) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी दिले. विशेष म्हणजे, आरोपी हा एचडीएफसी बँकेत नोकरी करत होता.

ब्रिजेश इंद्रमण्णी शुक्ला (२५, रा. मस्कनवा, गोंडा ह.मु. तितोआ चौराहा खलीलाबाद, संत कबीर नगर, उत्तर प्रदश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात यापूर्वी आरोपी आशिषकुमार मौर्य याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात एन-५ सिडको येथील सह्याद्रीनगरात राहणाऱ्या शीतल व्यंकटराव पाटील (३७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची फेसबुकवर ली चांग (अँड्रेसन) नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने २०२० च्या दिवाळीनिमीत्त ज्वेलरी, शुज, मोबाइल, विदेशी चलन (पौंड) गिफ्ट पाठविल्याची थाप फिर्यादीला मारली. सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी बाजू मांडली.

पोलिसांनी गुन्ह्यातील बँक खात्याचा तपास केला असता ब्रिजेश शुक्ला याच्या नावे खाते असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी ब्रिजेश शुक्ला याला बेड्या ठोकल्या. त्याच्या घर झडतीत सिंडीकेट बँक, अलाहाबाद, एचडीएफसी बँकेचे पासबूक आणि चेकबूक तसेच ग्राहकाचे नाव, पत्ते, मोबाइल क्रमांक लिहलेली नोटबूक पोलिसांनी हस्तगत केली.

कमिशनसाठी खाते दिले वापरायला

आरोपी ब्रिजेशची चौकशी केली असता, दोन वर्षांपूर्वी आरोपीची तोंडओळख मोहित नावाच्या व्यक्तीशी झाली होती. मोहितने आरोपीचे बँक खाते वापरण्यासाठी घेतले. त्या खात्यावर आलेल्या रकमेवर मोहित आरोपीला दहा टक्के कमिशन देत होता. मोहितच्या सांगण्यावरूनच आरोपीने एस.बी. इंटरप्रायेजस नावाने बँक ऑफ इंडिया बँकेत खाते उघडले होते. त्या खात्याचे पासबूक, चेकबूक आणि एटीएम कार्ड मोहितकडे असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com