४५ रुपये परत मिळवण्याच्या नादात ४० हजार गमावले!

४५ रुपये परत मिळवण्याच्या नादात ४० हजार गमावले!

सायबर चोराने मारला डल्ला

औरंगाबाद - aurangabad

सर्व्हिस चार्जच्या (Service charge) नावाखाली ४५ रुपये कट झाल्याचे पाहून ते परत मिळवण्याच्या नादात एका कंपनी कामगाराला तब्बल ४० हजाराचा फटका बसला. दरम्यान, आपले (Bank account number) बँक खाते नंबर (Password) पासवर्डसह इतर कोणतीच माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहान औरंगाबादच्या सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.

शहरातील सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामधून सर्विस चार्ज म्हणून ४५ रुपये कापण्यात आले होते. याचा जाब विचारण्यासाठी त्या कामगाराने गुगलवर जाऊन एसबीआयच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवून त्या नंबरवर फोन केला. मात्र त्या वेळेस बोलणे झाले नाही.

थोड्याच वेळात त्या कामगाराला फोन आला व एसबीआयमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा कामगाराने त्याला ४५ रुपये कपात झाल्याचे सांगितले. नंतर सायबर चोराने त्यांना सांगितले की, पैसे मिळवायचे असतील तर 'एनी डेस्क' नावाचे ऍप डाऊनलोड करा. कामगाराने तत्काळ ॲप डाऊनलोड केले. ऍपमध्ये खात्याची माहिती भरण्यास सांगितले. कामगाराने तेसुद्धा केले. एटीएमचा असलेला सोळा अंकी नंबरही भामट्याने मागून घेतला. काही वेळातच कामगाराच्या खात्यातून चार हजार रुपये कमी झाले. त्यानंतर थोड्या वेळाने ४० हजार रुपये गायब झाले. शेवटी केवळ १९ रुपये शिल्लक होते, तेसुद्धा भामट्याने सोडले नाहीत. हे सर्व घडले ते फक्त ४५ रुपये परत मिळविण्याच्या नादात.

आपले बँक खाते नंबर पासवर्डसह इतर कोणतीच माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहान औरंगाबादच्या सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com