Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याकर्जमाफी मिळवणारे साडेचार हजार शेतकरी ‘गायब’?

कर्जमाफी मिळवणारे साडेचार हजार शेतकरी ‘गायब’?

औरंगाबाद – aurangabad

महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule) योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील 4 हजार 755 शेतकरी गायब झाले आहेत. वारंवार कळवूनही हे शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी सहकार खात्याच्या वतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण न केल्यास या शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) (सहकारी संस्था) अनिलकुमार दाबशेडे यांनी सांगितले.

- Advertisement -

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची कर्जे महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाने 27 डिसेंबर 2019 रोजी माफ केली होती.

औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 42 हजार 843 शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला होता. यापैकी दोन लाख 38 हजार 88 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, इतर 4 हजार 755 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असल्याचे अनिलकुमार दाबशेडे यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या सहकार आयुक्तांनी नुकताच कर्जमाफी योजनेचा आढावा घेतला. आधार प्रमाणीकरण व तक्रारींच्या निवारणासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सहकार आयुक्तांनी दिल्या. त्यानुसार सहकार खाते कामास लागले आहे.

आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. आता आधार प्रमाणीकरणासाठी शेतकर्‍यांना ही शेवटची संधी आहे. संबंधित शेतकर्‍यांनी जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या