ऐतिहासिक पानचक्कीतील हजारो माशांचा मृत्यू

वाढत्या तापमानाचा परिणाम
ऐतिहासिक पानचक्कीतील हजारो माशांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


तापमानाने (temperature) चाळीशी ओलांडल्याने ऐतिहासिक पानचक्कीमधील हौदातील पाणी आटत गेले व उरलेल्या दूषित पाण्यामुळे त्यातील सर्व मासे (fish) मृत्युमुखी पडले. मृत मासांच्या दुर्गंधीने पर्यटक त्रस्त झाले आहेत. शेवटी मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून हौतातील पाणी उपसल्यानंतर मृत मासे बाहेर काढण्यात आले. वक्फ बोर्ड प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षीच पानचक्कीच्या हौदातील मासे मृत पावतात. याबाबत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या पानचक्कीत शहरापासून सात किलोमीटर दूर असलेल्या डोंगररांगातून नहरीद्वारे पाणी आणले असून या पाण्यावर स्वयंचलीत अशी पिठाची गिरणी बसविण्यात आली आहे. नहर-ए-अंबरी आणि पानचक्कीसारखे अदभूत तंत्रज्ञान पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येतात. पानचक्कीच्या हौदात दरवर्षी मासे सोडण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात नहरचे पाणी आटले. त्यामुळे हौदातील पाणी दूषित झाले होते. हे पाणी बदलण्यात आले नसल्याने ते अधिकच दूषित होऊन दुर्गंधी सुटू लागली. या दूषित पाण्यामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे हौदातील मासे मृत पडू लागले. त्यामुळे सोमवारी जाळे टाकून काही मासे बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला.

मंगळवारी बहुतांश मासे मृत पावले. त्यामुळे पानचक्की परिसरात मोठी दुर्गंधी पसरली. याचा त्रास पर्यटक आणि पानचक्की भागात वक्‍फच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे. उशिरा जाग आलेल्या वक्फ प्रशासनाने महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना बोलावून हौदातील पाणी उपसून काढले. त्यानंतर मृत पावलेले सर्व मासे पोत्यात भरून फेकले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com