
औरंगाबाद - Aurangabad
महापालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलचे सोमवारपासून फायर ऑडिट करण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला आहे. त्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरार मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विरार येथील एका खासगी दवाखान्यातील कोविड केअर सेंटरमध्ये आग लागल्यामुळे चौदा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेच्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या. सरकारने देखील कोविड केअर सेंटरमध्ये फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार औरंगाबाद शहरातील कोविड केअर सेंटर्सचे फायर ऑडिट करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. अग्निशामन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांनी ही माहिती दिली.
सरकारच्या आदेशानुसार कोविड केअर सेंटरचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केल्या आहेत. त्याच्या सूचनेनुसार फायर ऑडिटचे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिकेचे २१ कोविड केअर सेंटर सुरू आहेत, त्याशिवाय खासगी दवाखान्यांचे ५८ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. या सर्व कोविड केअर सेंटर्सचे ऑडिट सोमवारपासून सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरची माहिती जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून मागवली आहे. यादी प्राप्त झाल्यावर ग्रामीण भागात देखील कोविड केअर सेंटरच्या फायर ऑडिटची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.