वैचारिक भूमिकेतून सण साजरे व्हावेत

डॉ.आरतीश्यामल जोशी यांचे मत  
वैचारिक भूमिकेतून सण साजरे व्हावेत

औरंगाबाद - aurangabad

सण-उत्सवाचा (festival) ताण हा महिलांवर अधिक असतो. अवैतनिक कामांचे वाढणारे ओझे, वैविध्यपूर्ण स्वयंपाकाचा ताण, सजावट, पूजा, स्वच्छता, नातेवाईकांचे  स्वागत, खरेदी त्यात नोकरदार, व्यावसायिक महिलांची तारेवरची कसरत होते. ऐन सणाच्या काळात मासिक पाळी नको म्हणून पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतल्या जातात. त्यामुळे पुढे त्रास होतो. सण साजरे करताना विज्ञानवादी विचारवादी भूमिकेतून साजरे व्हावेत, महिलांनी सुहासिनी, विधवा, कुमारीका हा भेद न करता सर्व समावेश उत्सव करावा. सर्व कामे स्वत: करण्याचा अट्टाहास टाळावा. घरच्यांचीही मदत घेतल्यास ताण येणार नाही, असे मत डॉ.आरतीश्यामल जोशी (Dr. Artishyamal Joshi) यांनी व्यक्त  केले.

सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने 'भारतीय सण-उत्सव आणि महिलांमध्ये येणारे ताण-तणाव' या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी या विषयांची तीन भागात मांडणी करत सणांच्या काळात येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन कसे करता येईल यावर भाष्य केले. पितृसत्ताक समाजात जगताना येणारे सर्व सण उत्सावांना पुरुषसत्तेचे आवरण दिसते. उपवास, व्रत, वैकल्ये करताना महिला सतत पती, पिता, भाऊ, मुले यांच्यासाठी सातत्याने उपवास करत असतात. नात्याचा पाया हा विश्वास असून पूजा, उपवास कदापि असू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

शकीला पठाण यांनी मुस्लिम समाजातील सण साजरे करण्याच्या स्वरूपाबद्दल सांगितले व त्यातून येणाऱ्या ताणावर भाष्य केले. डाॅ. मंजुषा शेरकर व डॉ. रेणू चव्हाण यांनी सणाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार निर्मिती होते हे लक्षात घेऊन महिलांचा ताण कमी करण्याच्या हेतूने या छोट्या उद्योगाची कशी मदत घेता येईल याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

ॲड.ज्योती पत्की यांनी कर्मकांडात पुढच्या पिढीला गुंतवू नका, घरच्या कामात कुटुंबियांचा सहभाग वाढवा, असे आवाहन केले. डॉ.रश्मी बोरीकर यांनी सणांचे स्वरूप बदलत असून अधिक फॅन्सी सण करण्याकडे कल वाढला आहे. दुर्दैवाने समाजात सण साजरे होताना भेदभावाची मानसिकता असते. मासिक पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टींचा बाऊ करणे टाळले पाहिजे असे त्या म्हणाल्या. मंगल खिवंसरा यांनी सण अधिक खर्चात, उत्साहात साजरा करण्याकडे कल वाढल्याचे सांगितले. यामुळे धार्मिक कट्टरता वाढण्याचा धोका व्यक्त केला. महिलांमध्ये भेदाची दरी सणांच्या निमित्ताने येऊ नये, असे त्या म्हणाल्या.

डॉ. सुजाता पाठक यांनी महिलांनी सुपर वुमन होण्याचा अट्टाहास टाळावा, डॉ. अनु मधाळे यांनी ताणतणावाचे विपरीत परिणाम शरीरावर कसे होतात हे विषद केले. ज्योती नांदेडकर, शालिनी बुंदे, सुलभा खंदारे, शंकुतला लोमटे, सुनिता जाधव, सरस्वती जाधव, ललिता गादगे यांनी सण–उत्सवातून येणारा ताणतणाव हा कुटुंबातूनच कमी करण्यात आला तर महिलांवर त्यांचे ओझे राहत नाही हे स्वानुभवातून उपस्थितांना सांगितले. कल्पना राजपूत, प्राचार्या मनोरमा शर्मा, मीना खंडागळे, पद्मा तापडिया, संगीता गुणारी यांचीही उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com