विनाकारण फिरणाऱ्यांना कोरोना चाचणीचा धाक!

पोलिसांची अनोखी शक्कल; १६ रुग्ण सापडले
विनाकारण फिरणाऱ्यांना कोरोना चाचणीचा धाक!

औरंगाबाद - Aurangabad

रस्त्यांवरील गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने आता अनोखी शक्कल लढवली आहे. रस्त्यांवर विनाकारण वावरणारांना पकडून त्यांची थेट कोरोना चाचणी करण्याचा प्रयोग पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे.

या प्रयोगामुळे चेकिंग पॉइंटवर अनेकांची शुक्रवारी कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, अनेकांनी पथकांना पाहून माघारी फिरत पर्यायी मार्गाने धूम ठोकल्याचेही दिसून आले. शुक्रवारी 15 पोलीस ठाण्यांतर्गत 161 व्यक्तींच्या चाचण्या केल्या. त्या तीनजण पॉझिटिव्ह निघाले.

राज्यभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. त्यातल्या त्यात औरंगाबाद शहरात व ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव गतीने होत असून नागरिक शिस्त पाळत नसल्याने यास अधिकच आमंत्रण मिळते आहे. यातच आता राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार नागरिकांना शिस्त लावण्यासाठी, कोरोना नियमांचे उल्लंघन करणारांवरील कारवाईसाठी शहरात पोलीस व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे पथके तैनात केली आहेत.

मात्र तरीही रस्त्यांवर विनाकारण वावरणार्‍यांचे प्रमाण कायम असल्याने आता प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणारांसाठी प्रशासनाने शहरात शुक्रवारपासून प्रमुख रस्त्यांवर सहा ठिकाणी पथके तैनात केली आहे. या पथकांत पोलीस, पालिका व जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी आहेत. ही पथके रस्त्याने वावरणार्‍या प्रत्येकाची कसून चौकशी करत आहे. त्यात विनाकारण वावरणार्‍यांना पकडून त्यांची सक्तीने कोरोना चाचणी केली जात आहे. प्रशासनाच्या या प्रयोगामुळे रस्त्यावर फिरणार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान, अनेकांनी पोलिसांची हुज्जत घातली. तर काहींनी पथकाला पाहून दुरूनच माघारी पळ काढल्यााचे चित्र दिसून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com