शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे

औरंगाबाद-Aurangabad

मराठवाड्यात मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये मोसंबी कच्चा मालाच्या स्वरुपात विक्रीसाठी नेण्यापेक्षा मोसंबीवर प्रक्रिया करुन विकल्यास चांगली किंमत (दर) मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी केले.

महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोसंबी फळपिक उत्पादन, सुगीपश्चात हाताळणी, प्रक्रिया संबंधी कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, मराठवाड्यात मोसंबी उत्पादनात 5 जिल्हे अग्रेसर असून 48 हजार हेक्टर क्षेत्रातून सुमारे साडेचार लाख मेट्रीक टन मोसंबीचे उत्पादन घेण्यात येते. केंद्र सरकारने देखील कृषी मालाची निर्यात दुप्पट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मोसंबीवर प्रक्रिया करुन विकल्यास शेतक-यांच्या नफ्यात नक्कीच वाढ होणार आहे. आशियाई विकास बँकेने देखील सार्वजनिक क्षेत्रात पायाभुत सुविधांसाठी गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. शेती क्षेत्रामध्ये क्षमता बांधणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गटशेतीला प्राधान्य द्यावे. गटशेतीमुळे नक्कीच उत्पादन खर्च कमी येऊन उत्पादनात वाढ होते असे सांगूण जिल्हाधिकारी म्हणाले की मोसंबी उत्पादनात विभागातील काही जिल्हे आघाडीवर आहेत. मोसंबीचे दर हेक्टरी 8 ते 10 टन उत्पादन घेतले जात असून हेच प्रमाण 40 टनापर्यंत नेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नव नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपले उत्पादन वाढवावे. सध्या विभागात करमाड आणि जालना येथे मोसंबी सुविधा केंद्र सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बोलताना मॅग्नेटचे प्रकल्प संचालक दिपक शिंदे म्हणाले की, आशियाई विकास बँकेकडून मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी 1 हजार कोटीचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या माध्यमातून शेतक-ऱ्यांची क्षमता बांधणी करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून उत्तम फळपीक पध्दतीचे प्रशिक्षण सुध्दा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय कृषी सह संचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक दीपक शिंदे आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com