शेतकर्‍यांना सोमवारपासून भरपाई

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई| Mumbai

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना सोमवारपासून नुकसान भरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल,

अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकर्‍यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकार्‍यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल.

त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकार्‍यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकर्‍यांना दोन हफ्त्यात मदत मिळणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटींचा असणार आहे.

ते गुरुवारी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आता रब्बी पिकांसाठी पेरणी करायची असल्याने शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकर्‍यांना मदत करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

तसेच राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकार दिवाळीनंतर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत सध्या दिवसाला करोनाचे सहा हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे. भाजपने संतांची वाणी ऐकली नाही का? देव देवळात नव्हे तर माणसात असतो.

गोव्यातही अजून मंदिरं सुरु झालेली नाहीत. तिथे कोणाचं सरकार आहे. त्यामुळे भाजप मंदिरांच्या मुद्द्यावरुन केवळ राजकारण करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावरुन राजकारण सुरु असल्याने याबाबतचा निर्णय रखडल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

अहमदनगर जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांना मिळणार मदत

सप्टेंंबर महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या धुव्वाधार पावसाने 11 तालुक्यांतील 387 गावांतील 1 लाख 16 हजार 638 शेतकर्‍यांचे 64 हजार क्षेत्रावरील पिकांना दणका बसला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे 58 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान सप्टेंबरमधील पावसाच्या तडाख्यातून अकोले, कर्जत आणि जामखेड तालुका मात्र वाचलेले आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि अनैसर्गिक पावसामुळे जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांना 156 कोटी रुपयांचा दणका बसला आहे. या पावसामुळे 1 लाख 64 हजार क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या दोन महिन्यांत 215 कोटींचा फटका बसला आहे. या शेतकर्‍यांना आता मदत मिळणार आहे.

अशी मिळणार मदत

शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *