Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या पीक कर्जाची रक्कम 'सीएसपी' चालकाच्या खात्यात!

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची रक्कम ‘सीएसपी’ चालकाच्या खात्यात!

औरंगाबाद – Aurangabad

एकीकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना खुलताबाद (Khultabad) तालुक्यातील सुलतानपूर येथील सीएसपी अर्थात (Customer service point) कस्टमर सर्व्हिस पॉईंटच्या चालकाने परस्पर लाखो रुपये आपल्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने वळते केल्याचे उघड झाले आहे. अविनाश बाळू चव्हाण असे सीएसपी चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

कोरोना (Corona) संसर्गकाळ सुरू असल्याने बँकांनी शाखेत ग्राहकांची गर्दी होऊ नये, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी सीएसपी म्हणजेच कस्टमर सर्व्हिस पॉईंटचा (ग्राहक सेवा केंद्र) आधार घेतला. विशेषतः ग्रामीण भागात या ग्राहक सेवा केंद्रांमुळे ग्राहकांना, शेतकऱ्यांना बँकेशी निगडित अनेक सेवांचा लाभही झाला. परंतु, खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील ग्राहक सेवा केंद्राचा चालक अविनाश बाळू चव्हाण याने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून तर दिलेच शिवाय त्या शेतकऱ्यांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपये स्वतःच्या सेव्हिंग खात्यात वळती करून घेतले.सुलतानपूरचे ६० वर्षे वयाचे प्रकाश रखमाजी चव्हाण यांना एसबीआय वेरूळ शाखेतून १० नोव्हेंबर २०२० रोजी एक लाख १ हजार ४०० रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाले. आपल्याला पीक कर्ज मंजूर झाले, त्याची रक्कम आपल्या खात्यात बँकेने ट्रान्सफर केली हे प्रकाश चव्हाण यांना माहीतही झाले नाही. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी ग्राहक सेवा केंद्राच्या अविनाश बाळू चव्हाण याच्यामार्फत कर्जाची फाईल दाखल केली होती. त्यानंतर बँकेतून कर्ज मंजुरीचा फोन किंवा मोबाईलवर मेसेज येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु प्रकाश चव्हाण यांच्या ३५२७९०८३१५१ या पीक कर्जाच्या खात्यातून अविनाश बाळू चव्हाण याने १३ नोव्हेंबर २०२०, १८ नोव्हेंबर २०२०, २३ नोव्हेंबर २०२० रोजी प्रत्येकी १० हजार रुपये ६२२४१३६४५०८ या आपल्या सेव्हिंग खात्यात ट्रान्सफर करून घेतले. २४ जून २०२१ रोजी प्रकाश चव्हाण यांना कर्ज परतफेडीचा मेसेज मोबाईलवर आल्याने त्यांना धक्का बसला. आपण कर्जाचा लाभ न घेता परतफेड करायची कशी?, असा प्रश्न त्यांना पडला.

कानडगाव येथील पंढरीनाथ सांडू धुमाळ यांनाही प्रकाश चव्हाण यांच्याप्रमाणेच फसवण्यात आले. त्यांनाही एसबीआय वेरूळ शाखेने २३ डिसेंबर २०२० रोजी एक लाख ४ हजार ६०० रुपये पीक कर्ज मंजूर झाले. सदरील रक्कम पंढरीनाथ सांडू धुमाळ यांच्या ३९६८९४९६५७३ या खात्यात रक्कम बँकेने जमा केली खरी परंतु दुसऱ्याच दिवशी २४ डिसेंबर २०२० रोजी ग्राहक सेवा केंद्राच्या अविनाश बाळू चव्हाण याने ३० हजार रुपये आपल्या ६२२४१३६४५०८ या सेव्हिंग खात्यात वळते करून घेतले. शिवाय ३१ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा त्याने ४४ हजार रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. या दोन्ही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे.

आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता

प्रकाश चव्हाण यांनी या गैरव्यवहाराची माहिती दिली. आम्हाला माहीत नसताना ग्राहक सेवा केंद्रचालक अविनाश चव्हाण याने परस्पर आमच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतले आहेत. असे शेकडो शेतकरी ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक कर्जाच्या फाईल बँकेत पाठवतात. त्यामुळे अनेकांची आमच्यासारखी फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. आता बँकेने आम्हाला पैसे भरण्यासाठी मेसेज पाठवायला सुरुवात केली असून आम्ही पैसे परतफेड करायचे तरी कसे?, असेही प्रकाश चव्हाण विचारतात.

बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले जाते. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना गतीने मदत करण्याचे एसबीआयचे धोरण आहे. आम्ही पीक कर्जाची प्रकरणे लवकरात लवकर निकाली लावून त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रकाश चव्हाण आणि पंढरीनाथ धुमाळ यांना पीक कर्ज त्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यांच्या खात्यातील मोठ-मोठ्या रकमा ग्राहक सेवा केंद्रचालक अविनाश बाळू चव्हाण याने आपल्या सेव्हिंग खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याचा प्रकार स्टेटमेंट काढल्यावर समोर आले आहे. शेतकरी आणि ग्राहक सेवा केंद्रचालक यांच्यात काही व्यवहार झाला असेल तर ते तपासायला लागेल.

– आकाश गुप्ता, व्यवस्थापक, एसबीआय, वेरूळ

- Advertisment -

ताज्या बातम्या