जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक खाते!

फेसबुक मेटासह जिओची चौकशी
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक खाते!

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय (Collector Astikkumar Pandey) यांचे फेसबुक (Facebook) व व्हाट्सअपवर (Whatsapp) वारंवार बनावट खाते तयार होतेच कसे?, असा प्रश्न उपस्थित करून शहर सायबर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी आता 'फेसबुक मेटा'सह 'रिलायन्स जिओ'च्या भारतातील नोडल अधिकार्‍यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. १ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबी सुद्धा दिली आहे.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या नावाने वारंवार बनावट फेसबुक खाते तयार केले जात आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नी मोक्षदा पाटील यांच्या नावानेही असेच बनावट खाते तयार केले होते. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्‍त व सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यावर फेसबुक मेटाला पत्रव्यवहार करून हे बनावट खाते ब्लॉक केले जायचे. आतापर्यंत त्यांची तीन खाती अशाच पद्धतीने ब्लॉक केली आहेत. तरीही तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने बनावट व्हाटस अप खाते असल्याचे समोर आले. तसेच, बनावट फेसबुक खातेही पुन्हा तयार केल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, हे बनावट खाते तयार करण्यासाठी रिलायन्स जिओच्या दहा मोबाईल नंबरचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे फेसबुक मेटासह आता रिलायन्स जिओच्या नोडल अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिओच्या पुण्यातील नोडल अधिकार्‍याला आणि फेसबुक मेटाच्या भारतातील नोडल अधिकाऱ्याला सीआरपीसी १६० नुसार समन्स बजावले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी दाखल केलेल्या फसवणुकीसह, बनावट खात्याच्या गुन्ह्यात चौकशी आणि नोडल अधिकार्‍यांचा जबाब नोंदविण्यासाठी १ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com