एकतर्फी प्रेमात स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी!

मुलाचा मृत्यू ; मुलीची मृत्यूशी झुंज
एकतर्फी प्रेमात स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी!

औरंगाबाद- Aurangabad

विद्यापीठ लेणी परिसरातील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणार्‍या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून घेत विद्यार्थिनीला मिठी मारल्याने दोघेही गंभीर भाजल्याचा प्रकार घडला. हा खळबळजनक प्रकार सोमवारी घडला. या प्रकारात त्या मुलाचा मृत्यू झाला असून मुलगी ३५ टक्के भाजली आहे. 

दरम्यान, शासकीय न्यायविज्ञान संस्थेत काम करणार्‍या कर्मचारी यांनी दोघांना लागलेली आग विझवुन त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. पूजा साळवे (२८ रा एन-७ सिडको) असे जळालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

देशात महिला हत्येचे प्रकरण सुरू असताना शहरात पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमप्रकरणात महिलेला जाळण्याचा प्रकार घडल्याने महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूजा साळवे ही जीवभौतिकशास्त्र या विषयामध्ये संशोधन करत असून ती शासकीय विज्ञान संस्थेत कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका वाडेकर यांना भेटण्यासाठी आली होती. गजानन मुंडे हा प्राणीशास्त्र विषयात संशोधन करत असून तो पूजा हीच्यावर एकतर्फी प्रेम करत असल्याने तो तीचा माग काढत विभागात आला.

पूजा ही वाडेकर यांना प्रयोगशाळेत संवाद साधत असताना गजानन हा आला त्याने प्रयोगशाळेच्या दरवाजाची कडी लावून घेत बॅगमध्ये आणलेली पेट्रोलची बाटली अंगावर ओतून घेतले. माझ्याशी लग्न करण्यास का नकार देते म्हणत त्याने लाइटरच्या सहाय्याने स्वत:ला पेटवून घेत पुजाला मिठी मारली. प्राध्यापिका वाडेकर यांनी आरडाओरड केल्यानंतर तळमजल्यावरील शासकीय न्यायवैद्यीक संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून दोघांना फायर सेफ्टीच्या मदतीने विजवून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त थोरात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

तीन सदस्यांची समितीची स्थापना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संशोधक विद्यार्थी आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात तीन सदस्यांची समितीची स्थापना कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केली आहे. कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, समिती सदस्यांसह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, सुरक्षा अधिकारी बी. एल. इंगळे यांनी घाटीला भेट दिली. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com