वेरूळ महोत्सव सलग पाचव्या वर्षी रद्द

नियोजनाचा अभाव
वेरूळ महोत्सव सलग पाचव्या वर्षी रद्द

औरंगाबाद - aurangabad

महाराष्ट्राच्या (maharastra) सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या वेरूळ-अजिंठा महोत्सवास (Ellora-Ajanta Festival) रसिकांना यंदाही पुन्हा मुकावे लागणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, राज्याच्या पर्यटन राजधानीत वेरूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठकही झालेली नाही.

१९८६ पासून वेरूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला कैलास लेणीसमोर होणारा महोत्सव २००२ पासून विद्यापीठातील सोनेरी महालात होतो. २००७ पर्यंत तो दरवर्षी उत्साहात झाला. नंतर विविध कारणांनी महोत्सव रद्द झाला. १५ वर्षांत फक्त तीनच महोत्सव होऊ शकले आहेत.

पर्यटन, सांस्कृतिक खाते आणि जिल्हा प्रशासन महोत्सवाचे आयोजन करतात. सुरुवातीला वेरूळ-अजिंठा महोत्सव समिती आयोजनात होती. २०१२ नंतर समितीऐवजी जिल्हा प्रशासन आले.

गेल्या आठवड्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अजिंठा महोत्सवाची घोषणा केली. दरवर्षी महोत्सव घेण्याचे संकेतही दिले. वेगळ्या महोत्सवाचा पायंडा पडला तर वेरूळ महोत्सव अडचणीत येऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते.

१ डिसेंबरपासून नाट्य व चित्रपटगृहांना १०० टक्के क्षमतेसह परवानगी मिळाली. पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव घेण्यास आयोजक आग्रही होते. सरकारने २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान महोत्सवाला परवानगी दिली. वेरूळ महोत्सवाच्या बाबतीत मात्र कारणे दिली जात आहेत.

आता आयोजन अशक्यच

आंतरराष्ट्रीय स्तराच्या महोत्सवाची तयारी ६ महिने आधीच करावी लागते. कलाकार, तारखा निश्चित झाल्यावर टूर कंपन्या, पर्यटन खाते याची प्रसिद्धी करते. पर्यटन कॅलेंडरमध्ये त्याचा समावेश होतो. देशी-विदेशी पर्यटक महोत्सवाचे औचित्य साधून टूर ठरवतात. हे वर्ष संपण्यास आठवडाच शिल्लक आहे. साधी बैठकही झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com