वीज बिल वसुलीसाठी आता 'हर घर दस्तक' मोहीम

औरंगाबाद परिमंडलात सुरुवात
वीज बिल वसुलीसाठी आता 'हर घर दस्तक' मोहीम

औरंगाबाद - aurangabad

वीज बिलांच्या (Electricity bill) प्रचंड थकबाकीमुळे महावितरण (MSEDCL) आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले (Dr.Mangesh Gondavale) यांच्या संकल्पनेतून "हर घर दस्तक" मोहीम राबवण्यात येत आहे.

ग्राहक नियमित व वेळेत वीज बिल भरत आहेत का, हे पाहण्यासाठी महावितरण कर्मचारी आता घरोघरी जाऊन वीज बिल भरल्याची खात्री करत आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजबिल ऑनलाईन भरण्यास अडचण आल्यास किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नसल्यास ग्राहकाचे बिल थकीत राहू नये म्हणून महावितरणचे कर्मचारी जागेवरच वीजबिलाची रक्कम स्वीकारून महावितरणच्या "एम्प्लॉई मित्र" ऍपद्वारे भरणा करत असून ग्राहकांना बिल भरल्याची पावती जागेवरच देत आहे.

जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी वीज ग्राहकांनी आपली वीजबिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मराठवाड्यात औद्योगिक व वाणिज्यिक ३१ हजार ८५७ वीज ग्राहकांकडे ४३.८० कोटी रूपयांची थकबाकी आहे. नोटीस बजावूनही वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्त करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. घरगुती ग्राहकांसह आता वाणिज्यिक ग्राहकांवरही महावितरणने कारवाई बडगा उगारला आहे.

वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंप, पथदिवे अशा सर्व वर्गातील ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेद्वारे वीजबिल वसुलीला वेग देण्यात आला आहे.

सर्वाधिक थकबाकी असलेल्या कृषिपंप ग्राहकांसाठी सवलत देण्यात आली असून निम्मे बिल माफ करण्यात आले आहे. थकबाकीमुळे महावितरणचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. कोळसा खरेदी करण्यासाठी खासगी कंपन्यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे कुणालाही वीज बिल माफ होणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर महावितरणने नोटीसा बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मराठवाड्यात ६२०५ औद्योगिक वीज ग्राहकांकडे ११.७१ कोटी रूपये थकबाकी आहे. वाणिज्यिक २५,६५२ ग्राहकांकडे ३२.०८ कोटी रूपये थकबाकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com