
औरंगाबाद - aurangabad
स्वयंसेवी संस्थांनी 'बदल' स्वीकारून पुढे जायला हवे. आपल्या कामाचे मूल्यमापन करून लोकांच्या गरजा आणि आसपासच्या माणसांची कौशल्य ओळखून उद्योग सुरू करायला हवे. एक उद्योग (Industry) अनेकांना रोजगार देतो. स्थानिक कला, पर्यटन (Tourism), अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये महिला आणि सामाजिक संस्थांनी उतरावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात घेतला तर ग्रामीण भागातील आर्थिक स्तर उंचावेल आणि हंगामी स्थलांतर कमी होईल, असा विश्वास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (Maharashtra Entrepreneurship Development Centre) विभागीय अधिकारी दत्तात्रय तावरे यांनी व्यक्त केले.
महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी 'स्वयंसेवी संस्थांची भूमिका व संस्थांची संघटन बांधणी' यासाठी गुरुवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. 'स्टेअप वूमन अँड चाइल्ड' डेव्हलपमेंट फाउंडेशन, नवी दिल्ली, 'आशामंत' फाउंडेशन सोलापूर, 'सरस्वती सेवाभावी संस्था', माजलगाव, जिल्हा बीड, 'उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था' औरंगाबाद यांनी मिळून कार्यशाळेचे आयोजन केले होते. मराठवाड्यातील ७६ तालुक्यातून १८२ संस्थांनी सहभाग घेतला.
व्यासपीठावर सरस्वती सेवाभावी संस्थेचे सचिव रमेश कुटे, आशामंत फाऊंडेशनचे अध्यक्ष हनुमंत बारबोले, उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हनवते, फेडरेशन ऑफ शेंद्रा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष मिलिंद पाटील, पत्रकार पृथा वीर उपस्थित होत्या. तावरे यांनी शासनाच्या विविध योजना, उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रम आणि क्लस्टर निहाय एक जिल्हा- एक पीक याविषयी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील वंचित असलेल्या एक कोटी महिलांना रोजगार देणे, संस्थांचे बळकटीकरण आणि स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना जागेवरच रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असा विश्वास रमेश कुटे यांनी व्यक्त केला.
महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी संस्थांनी सामाजिक काम करावे असे विचार हनुमंत बारबोले यांनी व्यक्त केले. मिलिंद पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी याकडे लक्ष वेधले. या संधी सामाजिक कामाचाच भाग असून स्वयंरोजगारात योगदान देणे गरजेचे आहे. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल असेही पाटील म्हणाले. कोव्हिड काळात एनजीओंचे महत्त्व प्रकर्षाने पुढे आले. त्यामुळे आता एनजीओंवर अधिक जबाबदारी असून आर्थिक सक्षमीकरणासोबतच बालविवाह, शालेय गळती, हंगामी स्थलांतर थांबवणे या विषयांसह जागतिक हवामान बदलांनुसार नव्या पद्धती, पीक पद्धती, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन द्यावे. सामाजिक बदलांशिलाय आर्थिक बदल शक्य नाही असे पृथा वीर यांनी नमूद केले.
यावेळी स्टेप वूमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे प्रतिनिधी दीपक चव्हाण, एसफोरएसचे सारंग पाटील यांनीही मार्गदर्शन केले. हरिओम गवारे, बाळासाहेब हावळे, रामदास गायकवाड, राजकुमार भगत, ज्ञानेश्वर निकम, संजय बनसोडे, सर्व जिल्हा समन्वयक यांनी परिश्रम घेतले.