Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठांना आता कारमध्ये लसीकरणाची सुविधा

ज्येष्ठांना आता कारमध्ये लसीकरणाची सुविधा

औरंगाबाद – Aurangabad

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी, तसेच वयोवृध्द नागरिकांना ताटकळत थांबण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबादेतही ड्राईव्ह इन ही लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. सोमवारपासून प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये लसीकरण केंद्र सुरू करून कारमधून या, लस घ्या ही मोहिम राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास कमी प्रतिसाद मिळत आहे. शिवाय दुसर्‍या डोसमधील अंतर देखील वाढवण्यात आले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत पालिकेच्या जम्बो मोहिमेतील 115 लसीकरण केंद्रे ओस पडली आहे. परिणामी, लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने 20 हजार लस पालिकेकडे पडून आहेत. 45 वर्षावरील नागरिकांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वयोगटातील 3 लाख नागरिक लसीकरणापासून अद्यापही दूरच आहेत.

लसीकरणाला प्रतिसाद मिळावा, जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर ताटकळत थांबावे लागू नये, यासाठी आता पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ड्राईव्ह इन ही संकल्पना राबविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कारमधून या, लस घ्या ही ड्राईव्ह इन ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारसह इतर चारचाकी वाहनामधून आलेले तसेच रिक्षामधून आलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली.

एपीआय कॉर्नर जवळील प्रोझोन मॉलच्या दोन्ही पार्किंगमध्ये लसीकरणाच्या ड्राईन इनसाठी व्यवस्था केली आहे. या पार्किंगमध्येच लस घेतलेल्या नागरिकांना अर्धातास थांबावे लागेल. लस घेण्यासाठी येताना आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे लागेल, असे पालिकेने सूचित केले आहे. 7 जूनपासून प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये लसीकरण केंद्र सुरू करुन सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या