सुंदर, गुणवत्तापूर्ण घरांची स्वप्ने म्हाडाच्या माध्यमातूनच पूर्ण

आगामी योजनाही गतिमानतेने पूर्ण करण्याच्या सूचना
सुंदर, गुणवत्तापूर्ण घरांची स्वप्ने म्हाडाच्या माध्यमातूनच पूर्ण

औरंगाबाद - Aurangabad

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सुंदर, सुबक, गुणवत्तापूर्ण अशा प्रकारची हक्काच्या घरांची स्वप्ने पूर्ण करून देते. यासाठी पारदर्शक अशा लॉटरी पद्धतीने विजेत्यांची निवड करते. आगामी काळातही औरंगाबादेतील विविध नियोजित योजना गतिमानतेने म्हाडा पूर्ण करेल, असा विश्वास उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद‍ गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या औरंगाबाद, हिंगोलीतील सदनिकांच्या विविध योजनेंतर्गत 864 सदनिकांच्या ऑनलाईन सोडत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. देसाई ऑनलाइन बोलत होते. यावेळी योजनेचे ऑनलाईन उद्घाटन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथून केले. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांचीही ऑनलाइन उपस्थिती होती.

औरंगाबाद येथील म्हाडा कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. शेटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अनिल थोरात आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, म्हाडाच्या पुढाकारातून आजपर्यंत अनेकांना हक्काची घरे मिळालेली आहेत. म्हाडाने पारदर्शक पद्धतीचा अवलंब करत लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. आगामी काळात चिकलठाणा परिसरात जवळपास 425 घरे म्हाडाच्या माध्यमातून तयार होणार आहेत. शिवाय जागतिक दर्जाच्या ऑरिक येथील उद्योगनगरीत म्हाडाने साडे सात हेक्टरची मागणी केलेली आहे, ती उद्योग विभागाने मान्य केली आहे. म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणाली सोबतच, दर्जेदार घरे व उत्कृष्ट सदनिका वितरण प्रक्रिया या सर्व बाबींनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जोपासला आहे. त्यामुळेच औरंगाबाद मंडळाच्या 864 सदनिकांकरिता 8 हजार 226 अर्ज प्राप्त झाले. सदनिका सोडतीला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता म्हाडाची घरे खऱ्या अर्थाने परवडणारी असल्याचे द्योतक आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिक परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाळूज-तिसगाव येथे म्हाडाला 13.28 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले. म्हाडाच्या सोडतीला मिळालेला प्रतिसाद बघता औरंगाबाद मंडळाने भविष्यात अधिक गृहनिर्माण राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मंत्री आव्हाड म्हणाले, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गृहबांधणीत यशस्वी प्रयोग केले आहेत. म्हाडाच्या पारदर्शक, विश्वासार्ह संगणकीय सोडतीमुळे सर्वसामान्य नागरिक गृहस्वप्नपूर्तीसाठी म्हाडाचा पर्याय प्राधान्याने निवडत आहेत. म्हाडा हा गृहनिर्मितीतील विश्वसनीय ब्रँड अधिक व्यापक करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळेच म्हाडा व खासगी विकासकांच्या सहयोगाने संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मितीवर भर देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे.

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे चिकलठाणा, नक्षत्रवाडी व ऑरिक सिटी येथे 5 हजार 500 परवडणाऱ्या सदनिकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या तीनही ठिकाणी गृहनिर्मिती प्रकल्पाला प्रारंभ केला जाणार आहे. या माध्यमातून औरंगाबादवासीयांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे लवकरच उपलब्ध होतील, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. म्हाडामार्फत खासगी विकासकांबरोबर संयुक्त भागीदारी प्रकल्प राबवून परवडणाऱ्या सदनिकांच्या उभारणीवर भर देण्यात येईल, असेही आव्हाड म्हणाले.

गृहनिर्माण राज्यमंत्री पाटील यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा मिळवून देण्यास गृहनिर्माण विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. शासनाच्या माध्यमातून गृहनिर्मितीकरिता जागा उपलब्ध झाल्यास सर्वांसाठी घरे या योजनेचे उद्दिष्ट सफल होऊ शकेल. परवडणाऱ्या दरात हक्काची दर्जेदार घरे निर्माण करणे ही म्हाडाची सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकीच आहे, असेही पाटील म्हणाले. सोडतीतील विजेत्यांचे श्री. देसाई, श्री. आव्हाड, श्री. पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com