सरसंघचालक डॉ.मोहन भागवत पाच दिवस औरंगाबाद भेटीवर

१० वर्षानंतर प्रदीर्घ मुक्काम
सरसंघचालक डॉ.मोहन भागवत पाच दिवस औरंगाबाद भेटीवर

औरंगाबाद - aurangabad

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) ११ ते १५ नोव्हेंबर औरंगाबाद भेटीवर येत आहेत. पाच दिवसात ते संघाच्या देवगिरी प्रांतातील संघटनात्मक कार्यासंबधी बैठका घेतील. संघ प्रचाराकांशी चर्चा करतील तसेच संघ परिवाराशी संबंधीत विविध क्षेत्रातील तज्ञांच्या भेटी घेतील. त्यांच्या दौऱ्यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

सरसंघचालक संघटनेच्या कार्यासाठी देशभर दौरे करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादला येत आहेत. ११ तारखेला हिंगोलीच्या नरसी येथील श्री संत नामदेव महाराजांचे मंदिर आणि गुरुद्वाराचे दर्शन घेवून जालनामार्गे संध्याकाळी औरंगाबादेत दाखल होतील. संघाच्या संकल्पनेत औरंगाबाद शहराचे २५ नगरात विभाग आहेत. ११ रोजी डॉ.भागवत यांच्या उपस्थितीत नगर स्तरावरील कार्यकर्त्यांचा सहकुटूंब एकत्रिकीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सरसंघचालक पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटूंब प्रबोधन याबाबत मार्गदर्शन करतील.

१२, १३ आणि १४ रोजी संघटनात्त्मक कार्याचा आढावा घेणाऱ्या बैठका होतील. पहिल्या दोन दिवसात प्रामुख्याने देवगिरी प्रांतात पूर्णवेळ कार्य करणारे प्रचारकांची आणि प्रांत कार्यकारिणी मंडळाच्या बैठका आणि प्रांतातील काही स्वंयसेवकांच्या भेटी होतील. १४ रोजी संघाच्या विविध संस्था, संघटनांची समन्वय बैठक होईल. यात सरसंघचालक कार्यकर्त्यांशी विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शन करतील. १४ रोजीच लहुजी साळवे आणि क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन केले जाईल. संघ परिवाराशी संबंधीत विविध क्षेत्रातील तज्ञांसोबतही सरसंघचालक संवाद साधतील. १५ रोजी विमानाने हैदराबाद मार्गे कोलकात्याला रवाना होतील.

सर्व कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवन येथे होणार आहेत. सरसंघचालकांचा एकही जाहीर कार्यक्रम नसल्याने केवळ निमंत्रीतांनाच प्रवेश असेल. यावेळी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी माहिती देवगिरी प्रातांचे संघचालक अनिल भालेराव आणि देवगिरी प्रांत कार्यवाह हरिष कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. आशिष जाधवर, विश्व संवाद केंद्र संयोजक ओंकार शेलदरकर, शहर प्रचारप्रमुख चेतन पगारे यांची उपस्थिती होती.

१० वर्षानंतर प्रदीर्घ मुक्काम

सरसंघचालकांनी औरंगाबाद शहरात २०११ मध्ये तीन दिवसांच्या मुक्काम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते ५ दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येत आहेत. यामुळे स्वंयसेवकांमध्ये उत्साह पसरला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com