जगभरातील डॉक्टरांनी जाणून घेतले गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचे तंत्र

हर्निया सोसायटीच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप
जगभरातील डॉक्टरांनी जाणून घेतले गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचे तंत्र
SHONTY CLICKS

औरंगाबाद aurangabad

"हर्निया सोसायटी ऑफ इंडिया'च्या (Hernia Society of India) राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी जगभरातील डॉक्टर व सर्जन यांनी शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून शंकांचे निरसन करून घेेतले. शस्त्रक्रिया लप्रोस्कोपी, रोबोटीक्स असो किंवा पारंपारीक पद्धतीने केलेली, तरी ऐनवेळी उद्भवणाऱ्या गुंतागुंतीवर कशी मात करायची, याचे प्रात्यक्षिकच त्यांना बघायला मिळाले. हर्नियाच्या क्षेत्रातील नवीन ज्ञान, तंत्रज्ञान आणि उपचाराच्या पद्धतीबाबत विचारांची देवाण-घेवाण करत परिषदेचा समारोप झाला. यावेळी देशभरातील ३० तज्ञांनी शोध निबंध सादर केले.

"हर्निया सोसायटी ऑफ इंडिया' च्या १५ व्या राष्ट्रीय परिषदेचे हॉटेेल रामा इंटरनॅशनलमध्ये औरंगाबादमध्ये आयोजन करण्यात आले होते. शनिवारी परिषदेचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशीचे मुख्य आकर्षण हर्नियावरील शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होते. कृपामयी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये तज्ञ सर्जन यांनी गुंतागुंतीच्या ६ शस्त्रक्रिया केल्या. त्याचे थेट प्रक्षेपण परिषदेत करण्यात आले. फेसबुक लाईव्ह व अन्य व्हर्चुअल प्लॅटफॉर्मद्वारे त्याचे जगभरात प्रसारण झाले. या प्रक्षेपणासाठी रूग्णालय ते हॉटेलपर्यंत खास ऑप्टीकल फायबरची लाईन टाकण्यात आली होती. यावेळी डॉ. ब्रम्हभट्ट पाठक, डॉ.युसूफ खान, डॉ. प्रविणकुमार वासडीकर, डॉ.मुकेश राठोड, डॉ.सरफराज बेग, डॉ.तरूण मित्तल, डॉ.दिपराज भांडारकर आणि डॉ.गणेश शेणॉय यांनी शस्त्रक्रिया केल्या.

दुसऱ्या सत्रात प्राईझ व्हिडीओ सेशनमध्ये मान्यवरांनी हर्नियस शस्त्रक्रियेसंबंधी आपले विचार मांडले. तर तिसऱ्या सत्रात अनुभवांची देवाण-घेवाण झाली. समारोपाच्या सत्रात १४ डॉक्टर आणि सर्जन यांनी शोध निबंधांचे सादरीकरण केले. परिषदेत एकूण ३० शोध निबंध सादर झाले. परिषदेत नवी दिल्लीतील एम्सचे माजी संचालक प्रा. एम. सी. मिश्रा यांना मानाचा 'एच. जी. डॉक्टर ओरेशन' प्रदान करण्यात आला. हर्नियावरील शस्त्रक्रियेशी संबंधित उत्पादनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

दोन दिवसांच्या परिषदेला हर्निया सोसायटीचे संस्थापक सदस्य डॉ. प्रदीप चौबे, सोसायटीचे मावळते अध्यक्ष रमेश अग्रवाला, सचिव डॉ. मनीष बैजल, कोषाध्यक्ष डॉ. रणदीप वाधवान, नवी दिल्लीचे विख्यात सर्जन डॉ. अजय कृपलानी, डॉ. पवनिंद्र लाल, मुंबईचे डॉ. दीपराज भांडारकर यांचे मार्गदर्शन लाभले. परिषद यशस्वी करण्यासाठी ऑर्गेनायझींग चेअरमन आणि "हर्निया सोसायटी ऑफ इंडिया'चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.विजय बोरगांवकर, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निखिल चव्हाण, सचिव डॉ. नारायण सानप, डॉ. सुशील देशपांडे, डॉ. भास्कर मुसंडे यांनी परिश्रम घेतले.

सर्वांच्या सहकाऱ्यामुळे शक्य

दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम, परिषदा ऑनलाईन होत होत्या. पहिल्यांदाच राष्ट्रीय परिषद आॅफलाईन पद्धतीने झाली. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे आयोजन झाले. शहराला तिसऱ्यांदा या राष्ट्रीय आयोजनाचा मान मिळाला. हा औरंगाबादचा बहुमान आहे. सर्वांच्या सहकाऱ्यामुळे हे आव्हान पेलता आले.-डॉ. विजय बोरगांवकर, ऑर्गेनायझींग चेअरमन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com