Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमराठा समाजातील प्रतिनिधींशी चर्चा

मराठा समाजातील प्रतिनिधींशी चर्चा

औरंगाबाद – Aurangabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सारथीचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) विभागीय कार्यालयासाठी विविध जागांची पाहणी केली. त्याचबरोबर वस्तीगृहे, शैक्षणिक सुविधांबाबत मराठा समाजातील प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर चर्चा करत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सारथीच्या कामकाजासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीस आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, मानसिंग पवार, डॉ. भगवान कापसे, विनोद पाटील, चंद्रशेखर राजूरकर, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, डॉ. मंगेश मोरे, डॉ. आर. एस. सोळुंके, सारथीचे निबंधक अशोक पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे उपस्थित होते.

शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास आदी बाबींवर बैठकीत मराठा समाजातील प्रतिनिधींनी चर्चा केली. या सकारात्मक चर्चेतून प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचे स्वागत करत सारथीचे कामकाज अधिक गतीमान करण्यात येईल, असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.

सध्याच्या काळाची गरज ओळखून प्रशिक्षणात बदल करण्यात येतील. मराठा समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी संस्थेचा पुढाकार राहील. समाजातील तरूणांनी यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांबरोबरच इतर क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांकडे वळावे. यश संपादन करावे. समाजाचे प्रतिनिधीत्व शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट आदी क्षेत्रात करावे. कुशल मनुष्यबळाला अधिक कुशल, अद्यावत करण्यासाठी सारथी पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. समाजाच्या प्रगतीसाठी तारादूत प्रकल्प पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे दांगट यांनी सांगितले.

बैठकीत आमदार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण द्या. राहण्याची उत्तम सुविधा द्या, आदी सूचना केल्या. तर आमदार दानवे यांनी जेईई, नीट परीक्षेसाठी समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे कोचिंग उपलब्ध करून द्या, यासह विविध प्रकारच्या सूचना केल्या. पाटील यांनी उद्दिष्ट ठरवून सारथीने काम करावे, असे सांगितले. पवार, डॉ.कापसे यांनीही सारथीला विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी देखील प्रतिनिधींच्या सूचनांचे स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या