चक्रधर स्वामींच्या अवतार दिनानिमित्त आज दीपोत्सव

महानुभाव आश्रमातही कार्यक्रम
चक्रधर स्वामींच्या अवतार दिनानिमित्त आज दीपोत्सव

औरंगाबाद - Aurangabad

महानुभाव संप्रदायाचे आद्य संस्थापक ईश्वरी अवतार सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा ८०० वा अवतार दिन गुरुवारी (२० ऑगस्ट) देशभरात दीपोत्सवाने साजरा केला जाणार आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महानुभाव संप्रदायातील लाखो अनुयायी ठिकठिकाणी दीपोत्सवात सहभागी होतील.

शहरातील ग्लोबल महानुभाव संघ, श्रीकृष्ण महानुभाव मंदिर महानुभाव आश्रम आणि ईश्वर ज्ञान युट्युब चॅनलच्या वतीने जालना येथील हत्तीखाना भागातील दत्त मंदिरात १२१ भोग अर्थात पंचावतार उपहार महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुंवर अमनाय महंत श्री कोठीबाबा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवाय अमरावती जिल्ह्यातील कारंजा पेठ येथे केंद्रीय मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे आयोजन प. पूज्य महंत कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबाजी यांनी केले आहे.

महानुभाव आश्रम झगमगणार

२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पैठण रोडवरील महानुभाव आश्रमातील श्रीकृष्ण मंदिर परिसर दिव्यांनी झगमगणार आहे. चक्रधर स्वामींच्या ८०० व्या अवतार दिनाचा सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती असेल. मठाधिपती महंत सुभद्राबाई कपाटे (आत्या) यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण ईश्वर ज्ञान युट्युब चॅनल व फेसबुकवर पाहायला मिळणार आहे.

संघप्रमुखांचा शुभेच्छा संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या कार्यावर प्रकाश टाकला. चक्रधर स्वामींच्या जीवनाचे, कर्तृत्वाचे सातत्याने स्मरण करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे होणे गरजेचे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com