धनंजय मुंडेंचा निकाल भविष्यात लागेलच 

अखेर पंकजा बोलल्या...   
धनंजय मुंडेंचा निकाल भविष्यात लागेलच 

औरंगाबाद - Aurangabad

धनंजय मुंडे यांनी महिलेशी संबंध ठेवल्याप्रकरणाचा निकाल हा भविष्यात लागेलच, असा विश्वास माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी अत्यंत समतोल प्रतिक्रिया दिली. 'हा विषय आता मागे पडला असला तरी यावर पुन्हा पुन्हा बोलावं लागू नये म्हणून बोलते, असं सांगून त्या म्हणाल्या, 'नैतिक, कायदेशीर आणि तात्विकदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करू शकत नाही. मात्र, अशा गोष्टींमुळं एखाद्या कुटुंबाला, कुटुंबातील मुलांना काहीही कारण नसताना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं आहे. एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. मीडियानं देखील संवेदनशीलता दाखवून एकूण प्रकरणावर परिणाम होऊ नये हे पाहावं. बाकी सगळ्या गोष्टींचा निकाल भविष्यात लागेलच.'

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळं उडालेला राजकीय धुरळा काहीसा शांत झाला आहे. तक्रारदार रेणू शर्मा हिनं तक्रार मागे घेतल्यानं धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही मागे पडली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com