....म्हणूनच खा.संजय काकडेंविरोधात गुन्हा

गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याने मला माझ्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटू लागली होती.
....म्हणूनच खा.संजय काकडेंविरोधात गुन्हा

पुणे (प्रतिनिधी) - गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याने मला माझ्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटू लागली होती. खूप अस्वस्थ वाटल्यानेच माझे मेव्हणे माजी खासद्र संजय काकडे आणि बहिण उषा संजय काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची वेळ आली, असा खुलासा बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

काकडे दाम्पत्याकडून माझ्या जीवाला काही धोका होऊ नये,यासाठीचा हा गुन्हा दाखल केल्याचे ढमाले म्हणाले. यामागे कुठलेही राजकीय षड्यंत्र नाही किंवा पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असण्याचे कारण नाही.या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असेही ढमाले म्हणाले.

माजी खासदारा संजय काकडे व उषा काकडे यांच्यावर त्यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे राजकीय षड्यंत्र असल्याचे, तसेच आपण १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा लावणार असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

ढमाले म्हणाले, “कौटुंबिक ईर्ष्येतून काकडे दाम्पत्याने २०१७ पासून वेळोवेळी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. घरातील वाद सामंजस्याने मिटवण्याचा आणि प्रचंड दबावाखाली असल्याने गेली दोन वर्षे गुन्हा दाखल करू शकलो नाही. परंतु, आता खूप अस्वस्थ व दबाव वाटू लागल्याने भीतीपोटी धीर एकवटून २७ मे रोजी पोलिसांना पत्र दिले. त्यानंतर २ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी एका दिवसात गुन्हा दाखल केल्याचे सांगून काकडे माध्यमांची दिशाभूल करत आहेत.

काकडे यांच्याशी गेल्या १० वर्षात माझा कुठलाही व्यावसायिक संबंध नव्हता, हे त्यांनी चुकीचे सांगितले आहे. २३ मे २०१९ रोजी आमच्यातील व्यवहार झाला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावा- बहिणीतील हा वाद चव्हाट्यावर आला. तीन वर्षांपासून राखी बांधून घेता आली नाही, याचे दु:ख वाटते. माझ्या प्रगतीची ईर्ष्या करणारी माझीच बहिण आहे, याचेही अधिक वाईट वाटते. आपल्या भावाच्या जीवावर उठण्याचा विचार करणाऱ्या बहिणीला ईश्वराने सुबुद्धी द्यावी असे ते म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com