
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
कोरोनाची (corona) धास्ती अजूनही कायम असतानाच एच-३ एन-२ (H3N2) या विषाणूने घराघरांत शिरकाव केला आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांतून आढळत आहेत. H3N2 हा संसर्गाचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी तो एक प्रकारचा कोरोनाच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी हात धुवावेत, मास्क घालावा तसेच गर्दी टाळावी, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
चार जण कोरोना पॉझिटिव्ह
शहरात इन्फ्लुएंझा एच-३,एन-२ व्हायरस आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घराघरांत ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. या व्हायरसची लक्षणे कोरोनासारखीच असून मनपाच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेतले असता चार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या चौघांवर घरीच उपचार सुरू असल्याचे अहवालात नमूद केले असून एकूण ऑक्टिव्ह गुणांची संख्या सात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, नेहमी हात धुवावेत, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
H3N2 विषाणूचे लक्षणे
H3N2 हा एक गैरमानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे. हा विषाणू सामान्यतः डुकरांमध्ये पसरतो आणि मानवांमध्ये संक्रमित होतो. त्याची लक्षणे हंगामी फ्लू सारखीच असतात. H3N2 विषाणूची लागण झाल्यावर ताप आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतात. खोकला किंवा नाक वाहणे तसेच अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.
आरोग्य विभागाचे आवाहन
शहरात सध्या H3N2 या व्हायरसची साथ असून रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.