निसर्गाची किमया : आळूच्या पानाला आले 'फुल'

नागरिकांमध्ये कुतूहल 
निसर्गाची किमया : आळूच्या पानाला आले 'फुल'
Abdul Shaikh

औरंगाबाद - Aurangabad

वाळूज येथे निसर्गाच्या किमयेने बागेत लावलेल्या आळूच्या पानाला फुल आल्याने परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे. आतापर्यंत आळूच्या पानाला फुल पाहिले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरातील नागरिक अळूच्या पानाला आलेले फुल पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.

वाळूज येथील गणेश वसाहत येथे राहणारे राजू शिवलाल (मूळ रा. सटाणा ता. वैजापूर) यांच्या घराच्या बागेत हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. राजपूत यांनी घराच्या परिसरात विविध जातीच्या झाडांची रोपटे लावली आहेत. त्यामध्ये चार महिन्यांपूर्वी त्यांनी गावाकडून अळूच्या पानाचे चार-पाच रोपटे आणून कुंडीत लावले होते. दररोज नित्यनियमित राजपूत यांच्या पत्नी तुळसाबाई झाडांना पाणी देत असताना सोमवारी त्यांना अळूच्या रोपट्याला फुल व कळी आल्याचे दिसले.

यावेळी त्यांनी याची माहिती कुटुंबाला तसेच वसाहतीतील नागरिकांना दिली असता अनेक वयोवृद्ध नागरिकांनी अशा प्रकारे अळूच्या रोपट्याला फुल आल्याचं प्रथमच पाहत असल्याचं सांगितलं. निसर्गाच्या किमयेने कुंडीत लावलेल्या चार रोपट्यांपैकी एकाला पिवळसर रंगाचे फुल आले असून दुसऱ्या रोपट्याला कळी दिसत आहे. अळूच्या रोपट्याला आलेलं फुल परिसरात चर्चेचा विषय झाला असून निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी नागरिक राजपूत यांच्या घरी मोठी गर्दी करत आहेत.

Related Stories

No stories found.