दसरा पावला; अडीचशे कोटींची उलाढाल!

औरंगाबादकरांमध्ये उत्साहाला उधाण
दसरा पावला; अडीचशे कोटींची उलाढाल!

औरंगाबाद - aurangabad

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्ताने वाहन बाजार, सराफा होम अप्लायन्सेस व इलेक्ट्रॉनिक्स मार्केट (Electronics market) तसेच कापड बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी झाली. रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्रातही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून सुमारे सव्वाशे घरांचे बुकिंग झाल्याचे क्रेडाईच्या (Credai) पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच दसऱ्यानिमित्त मार्केटमध्ये अडीचशे कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

शक्तीचे प्रतीक असणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवसांपासून सर्वत्र मंगलमय वातावरण व चैतन्य निर्माण झाले आहे. त्यात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्ताने शुक्रवारी सर्वत्र उत्साही वातावरण होते. या मुहूर्तावर एकतरी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळेच गुलमंडी, औरंगपुरा, टिळकपथ, पैठणगेट, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, पुंडलिकनगर रोडसह शहरातील विविध बाजारपेठेत तसेच मॉलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे व्यापारीवर्गात चैतन्य निर्माण झाले आहे.

रेडिमेड कपडे, साड्या आदी खरेदीसाठी शहरातील विविध कापड दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये ग्राहकांची मोठी लगबग दिवसभर दिसून आली. करोना रुग्णाची कमी झालेली संख्येमुळे यंदा दसरा सण चांगल्या पद्धतीने कॅश करता येईल, हे गृहित धरत व्यापाऱ्यांनी नवीन कलेक्शन आणत आपली दालने सज्ज ठेवली होती.

होम अँड किचन अप्लायन्सेस मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह, टोस्टर, ज्युसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह मोबाइल, स्मार्ट टीव्हीची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यास अनेक जण प्राधान्य देतात.

शुक्रवारी प्रामुख्याने सराफा बाजारासह शहर परिसरातील विविध सराफा प्रतिष्ठानांमध्ये ग्राहकांची वर्दळ दिसून आली. त्यात ग्राहकांसाठी समाधानाची बाब म्हणजे गुरुवारच्या तुलनेत सोने-चांदी ३०० ते ४०० रुपयांनी स्वस्त झाल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना काहीसे समाधान व्यक्त केले. शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति तोळा ४९ हजार ५०० रुपये तर, चांदीचा भाव ६४ हजार ८०० रुपये प्रती किलो असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

रिअल इस्टेट क्षेत्रातही ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 'फिलगुड' वातावरण असल्याचे चित्र आहे. शहर व परिसरात सुमारे १२ लाखांपासून फ्लॅट तर दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंतची बंगले उपलब्ध आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर १२५ हून अधिक घरांचे बुकिंग झाल्याची माहिती क्रेडाई पदाधिकाऱ्यांनी दिली. अनेक नागरिकांनी आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला असून काही बांधकाम व्यावसायिकांना आपले नवीन प्रकल्पही हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासह (Automobile market) ऑटोमोबाइल मार्केटमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. नेहमीप्रमाणे या मुहूर्तावर दुचाकीसह कार खरेदीसाठी ग्राहकांची वाहन बाजारात गर्दी होती. मुहूर्तावर नवीन वाहन आपल्या घरी आले पाहिजे, यासाठी ग्राहक लगबग करताना दिसत होते. त्यात काही कंपन्याचे कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.