औरंगाबाद शहरात पावसाची संततधार

निम्न दुधना धरणाची चार दरवाजे उघडली, वातावरणात वाढला गारठा
औरंगाबाद शहरात पावसाची संततधार

औरंगाबाद - Aurangabad

दोन दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. शहरात सकाळी सातपर्यंत 34.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 35.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुढील 4 दिवस संततधार कायम राहणार आहे.

शहरासह जिल्ह्यात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळत आहेत. शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू आहे. एमजीएम विद्यापीठाच्या स्वयचंलित हवामान केंद्रात सायंकाळी सातपर्यंत 34.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जुन्या शहरात रस्त्यांवर पाणी साचले आहे. जळगाव रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. मध्यरात्रीपासून सलग पाऊस सुरू असल्याने वातावरणात गारठा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 35.9 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पावसाचा खरीप पिकांना आणि जलसाठ्याला उपयोग झाला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात 16 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर (74.75), बोरसर (65), लोणी (75.75, कन्नड (71), चापानेर (67.50), चिकलठाण (80.75), पिशोर (86.75), चिंचोली (77), करंजखेड (105), सुलतानपूर (79.50), आमठाणा (90.25) आणि बोरगाव (65.25) मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

निम्न दुधनाची चार दारे उघडली

सेलू (जि. परभणी) (Parbhani) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने दुपारी दोनच्या सुमारास धरणाचे चार दरवाजे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे एकूण 4 हजार 232 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान, पाण्याची आवक वाढल्यास 'निम्न दुधना'तून पुन्हा मोठ्या विसर्गाची चिन्हे आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणक्षेत्रात 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहेगेल्या वीस ते पंचवीस दिवसांत धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात सुमारे अकरा दलघमी (अकरा अब्ज लिटर) पाण्याची भर पडली आहे. दरम्यान, सध्या पाणी पातळी स्थिर आहे. परंतु, वाढ झाली, तर आणखी दरवाजे उघडून विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशाराही निम्न दुधना पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com