बालगृहातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘सहयोग'

दोन वर्षापासून विनामूल्य वर्ग
बालगृहातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘सहयोग'

औरंगाबाद - Aurangabad

बालगृहात येणाऱ्या मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे आल्याने त्यांचा पाया पक्का होत नाही. यामुळे पुढील अभ्यास त्यांना समजत नाही. त्यांचा पाया पक्का करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘सहयोग फाऊंडेशन' (Foundation Sahayoga) दोन वर्षापासून विनामूल्य वर्ग घेत आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात त्याचे परिणाम समोर आले असून विद्यार्थ्यांनी 70 टक्क्याच्या वर मार्क मिळवले.

बालगृहांत येईपर्यंत काही मुले शिक्षणापासून वंचित तर काही अभ्यासात कच्चे असतात. बालगृहात अन्य विद्यार्थ्यासोबत ते शाळेत जातात. मात्र, पाया कच्चा असल्याने त्यांची शैक्षणिक वाढ खुंटते. ही बाब लक्षात आल्याने स्वंयसेवी संस्था सहयोग फाऊंडेशनच्या संस्थापक सनवीर कौर छाबडा आणि मीनल नाईक यांनी 2019 पासून या मुलांची शिक्षणाची तुटलेली साखळी जोडण्यासाठी वर्ग घेण्यास सुरूवात केली. 4 बालगृहातील 1 ली ते 10 वीचे 100 हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले.

सात शिक्षकांची टीम

सुरूवातीला महाविद्यालयीन विद्यार्थी शिकवायचे. त्यात सातत्य येत नसल्याने मानधनावर 7 शिक्षक नेमले. कोरोनामुळे ऑफलाईन वर्ग बंद झाले. सोशल मिडीयावर आवाहन करून जुने मोबाईल फोन आणि लॅपटॉप मागवले. ते मुलाना देवून ऑनलाईन वर्ग सुरू केले.

खास अभ्यासक्रमाची रचना

सनवीर यांना एमबीएच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांनी मुलांची बौद्धिक पातळी ओळखून त्यांना 3 गटात विभागले. प्रत्येक गटाचे आठवड्यात एक तासाचे 2 वर्ग होतात. अत्यंत कच्चे आणि दहावीच्या मुलांसाठी स्पेशल बॅच घेतली जाते. त्यांना अगदी बाराखडी पासून उजळणी, पाडे, बेरीज, वजाबाकी, वाचनाचे शिक्षण दिले जाते. गृहपाठ आणि महिन्याला टेस्ट होते. यात उत्तीर्ण झालेल्या मुलांना शालेय अभ्यासक्रम घेतात. हा अभ्यासक्रम "ब्रीज कोर्स' चे काम करतो.

मुलांनी मानले आभार

सनवीर आणि मीनल यांच्यासह किर्ती गाडे, राधीका शर्मा, दीपाली, रंजना आणि मैथीली अध्यापन करतात. शिक्षकदिनी मुलांनी भेटकार्ड तयार करून शिक्षकांचे आभार मानले. तर सीए संघटनेतर्फे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

मुख्य प्रवाहात आणतो

बालगृहातील मुले शाळेत जातात, पण पाया कच्चा असल्याने त्यांना अडचणी येतात. त्या दूर करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अजून 14 बालगृहातून विचारणा होत आहे. निधी आणि मणुष्यबळाअभावी ती पूर्ण करतांना अडचण येत आहे.

- सनवीर कौर छाबडा, संस्थापिका, सहयोग फाऊंडेशन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com