लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना (corona) विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे (Social distance) पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Minister of State Dr. Bhagwat Karad) यांनी नागरिकांना केले.

बजाज समूह आणि जिल्हा प्रशासनात मोफत कोविड लसबाबत सामंजस्य करार लासूर स्टेशन येथे पांडव लॉन्स याठिकाणी झाला. यावेळी डॉ.कराड बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी.पी. त्रिपाठी, किशोर धनायत, पंचायत समितींचे सभापती, सरपंच आदींची उपस्थिती होती.

डॉ. कराड यांनी सामाजिक जबाबदारीतून अनेक उल्लेखनीय कार्य बजाज समूह करत असते. बजाज समुहाने कोविड काळात शासनाला भरीव प्रमाणात मदत केली. कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राज्याला सहा लक्ष कोविड लस मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, ही कौतुकाची बाब आहे. कोरोना आजारापासून धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. जगभरातील कोविड लसीकरणाचा विचार केल्यास सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविल्या जात असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.

जिल्ह्यात जवळपास 33 लक्ष नागरिकांना कोविड लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी 30 टक्के नागरिकांना लसीकरण झालेले आहे. गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

बजाज समुहाने जिल्ह्यासाठी दोन लक्ष 30 हजार मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे प्रशासनाच्यावतीने आभारही मानले. यापूर्वी पंढरपूरमध्येही बजाज समुहाच्यावतीने लसीकरण शिबिर पार पडले. कोरोना विषाणूपासून बचावासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई सातत्याने नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्यासाठी आवाहन करत आहेत. त्यानुसार प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे अंतर पाळावे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

त्रिपाठी यांनीही प्रत्येक गावागावात लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी समुहामार्फत काही प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन केले.

कार्यक्रमामागील हेतू आणि गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित लसीकरण कार्यक्रम आणि त्यांची उपयोगिता आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रास्ताविकात आमदार बंब यांनी केले.

कार्यक्रमात मोफत कोविड लसबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे आणि बजाज समुहाकडून श्रीत्रिपाठी यांनी सांमजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com