लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी गावागावात

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी गावागावात

औरंगाबाद - aurangabad

कोरोनाची (corona) संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी पात्र नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात स्वत:चे लसीकरण करुन घ्यावे. लस पुर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना झाला तरी लस घेतलेली असेल तर त्रास कमी होतो आणि कमी कालावधीत आपण बरे होतो. लसीकरण वाढावे यासाठी जिल्ह्यातील ज्या गावाने शंभर टक्के लसीकरण केले आहे अशा पहिल्या 25 गावांना मी विकासकामांमध्ये अतिरिक्त निधी देणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी सांगितले.

जिल्हाभरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी चव्हाण सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देऊन जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी गावागावात जाऊन लोकांना प्रशासनाकडून प्रोत्साहित केले जात आहे.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री 8 वाजता कागजीपुरा येथील फैज ए आम ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्यास भेट दिली. त्यानंतर रात्री 9 वाजता वेरुळ येथील दर्गा मस्जिद येथे अनेक मुस्लीम बांधवांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले त्यानंतर सुलिभंजन, वेरुळ, कसाबखेडा गावांना भेट देत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी गल्ले बोरगाव येथे मुक्काम केला. आज सकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांनी शिवार फेरी मारली, दरम्यान गल्ले बोरगाव येथून 6 किलोमीटर पायी चालत जात शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या सोबत सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटील सिंधू बढे, तुकाराम हरदे, संजय भागवत, संतोष राजपूत, दिलीप बेडवाल यांच्यासह मॉर्निंग वॉक करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी बऱ्याच ग्रामस्थांनी कुतूहलात्मक प्रतिक्रिया दिली की ‘चव्हाण साहेब हे पहिले जिल्हाधिकारी आम्ही पाहिले की, जे खेडे गावात जाऊन मुक्कामी राहिले व जनतेशी थेट संवाद साधत आहेत व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत आहेत’

सकाळी 9.30 वाजता गल्ले बोरगाव येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी गल्ले बोरगाव येथील लसीकरण बूथला भेट दिली व लसीकरणाचा आढावा घेतला. तदनंतर गल्ले बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण निमित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. या वेळी मतदार यादीचे वाचन करण्यात आले. तसेच असंघटित कामगार नोंदणी व उर्वरित नागरिकांनी आपले तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com