पैठणनगरीत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

मंत्री भुमरे करणार शक्तिप्रदर्शन
पैठणनगरीत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

औरंगाबाद - aurangabad

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन सोमवारी (दि.१२) दुपारी २ वाजता कावसानकर मैदान येथे करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचे उदघाटन करणार असून त्यांचे पैठण तालुक्‍यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचेही भुमरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पैठण येथे होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्या वेळेस औरंगाबादला येत असून पैठण येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठण तालुक्‍याच्या विकासासाठी जवळपास २ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी दिला असून त्याबदल्यात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे ना.भुमरे यांनी यावेळी सांगितले. पैठण येथील कावसानकर मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांची होणारी सभा विक्रमी सभा होणार असून गेल्या ३० ते ३५ वर्षात पहिल्यांदाच अशी सभा होणार असल्याचे भुमरे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आपल्या दौऱ्यादरम्यान पैठण तालुक्यासाठी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, पैठणी क्लस्टरची घोषणा करण्याची शक्‍यता देखील यावेळी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना किती वेळेस औरंगाबादला किंवा पैठणला आले होते, असा सवालही यावेळी रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com