आजपासून जी २० परिषदेला सुरुवात

विविध विषयांवर होणार मंथन
आजपासून जी २० परिषदेला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar

ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरात आजपासून जी २० परिषदेला सुरुवात होत आहे. या बैठकीत जी २० राष्ट्रे, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) उपस्थित राहणार असून उपस्थित मान्यवरांसमोर लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडतील.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित राहतील. त्याशिवाय, या बैठकीला भारताचे २० शेर्पा अमिताभ कांत, २० चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्डन तुर्कतान आणि २० इंडोनेशिया २०२२ च्या अध्यक्ष उली सिलाही या बैठकीला उपस्थित राहतील. सुरुवातीच्या बैठकीत विविध विषयांवर आयोजित चर्चासत्रांमध्ये सहभागी सदस्य आपले विचार मांडतील. नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमधील महिलांचे सक्षमकरण, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या कृतीसाठी बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका, तळागाळामधील महिला नेतृत्वासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करणे, पायाभूत सुविधा आण कौशल्य विकासाद्वारे डिजिटल क्षेत्रातील लिंगभेद दूर करणे, शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी मार्ग तयार करणे आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास, या विषयांचा यात समावेश असेल. 

डब्ल्यू २० ची उद्दिष्टे

वुमन्स २० (डब्ल्यू २०) अंतर्गत यंदाच्या परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासातील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या तसेच इतरांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम वातावरण आणि व्यवस्था सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. डब्ल्यू २० चे एक मजबूत जागतिक जाळे निर्माण करायचे आहे. यात होणाऱ्या सर्वसमावेशक चर्चा आणि कृती यावर डब्ल्यू २० चे घोषणापत्र निश्चित केले आहे. यंदा डब्ल्यू २० संमेलनातून महिलांना सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यातून जगभरातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतील असा मानस आहे.

परदेशी अतिथींना भावले बचतगट

जी २० तील अतिथींना स्थानिक उत्पादन भावले आहे. जिल्हा परिषद उमेद अभियानाच्या अंतर्गत विशेष करून उभारण्यात आलेल्या बचत गटाचे स्टॉल विशेष आकर्षण ठरले आहे. रविवारी सहभागी परदेशी अतिथींनी महिलांनी या बचत गटाच्या स्टॉलला भेटी दिल्या. इतकेच नव्हे तर बचत गटाच्या महिलांनी बनवलेले पदार्थ आणि वस्तूविषयी कुतूहल दाखवले. काहींनी वस्तूही खरेदी केल्या. या उपक्रमासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील यांनी सांगितले. या स्टॉलमधील आधुनिक स्त्रीची रांगोळी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी वाड्याची उभारणी, गौरीची स्थापना तसेच हातानी बनविलेले खाद्यपदार्थ व वस्तू परदेशी पाहुण्यांना विशेष आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे, रंगीबेरंगी बांगड्यांनी विदेशी पाहुण्यांना आकर्षित केले. काही परदेशी महिलांनी बांगड्या घालून बघितल्या. यावेळी स्वतःचे सेल्फी व फोटो काढण्याची हौसही त्यांनी भागवली.

यावर होणार मंथन 

नॅनो, सूक्ष्म आणि स्टार्टअप उद्योगातील महिलांचे सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास महिलांच्या यशोगाथा,  पर्यावरणीय बदलासाठी जुळवून घेणाऱ्या कृतीसाठी बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका, तळागाळातील महिला नेतृत्वासाठी अनुकूल, सक्षम परिसंस्था निर्माण करणे, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासाद्वारे डिजिटल क्षेत्रातील लिंगाधारित विभाजन दूर करणे, शिक्षण, कौाल्य विकास आणि उद्योजकतेसाठी, महिलांसाठी मार्गाची निर्मिती, महिलांसाठी विकास धोरण आणि कायदे यावर परिषदेत मंथन होणार आहे. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com