
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
जिल्ह्यात कोविडची (covid) स्थिती अगदी नियंत्रणा असली तरी आरोग्य विभागाकडून (Department of Health) आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसी प्राप्त झाल्या आहेत. मात्र त्यांची संख्या केवळ १०० असल्याने लाखोंची जनसंख्या असलेल्या ग्रामीण भागात कोणाकोणाला लस द्यायची, असा संभ्रम जिल्हा परिषदेला पडला आहे.
पहिल्या टप्प्यात पहिला व दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात प्रिकॉक्शन डोस म्हणून बूस्टर डोसची मोहीम राबवण्यात आली. मध्यंतरी कोविडची स्थिती पूर्णत आटोक्यात आली होती. त्यामुळे लसीकरण मोहीम मंदावली होती. अनेकांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. काहींनी एकही डोस घेतला नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. तर आता नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध झाली आहे. सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ही लस देण्यात येणार असून ती मोफत असणार आहे. मध्यंतरी कोविड रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने शासनाकडे लसींची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात
१०० लसीचा साठा मिळाला आहे. ही लस साठ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे. ज्या ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतला आहे, अशांना याची गरज नाही. शासनाच्या आरोग्य विभागाकडून तिसर्यांदा लसीकरण मोहीम हाती घेण्याचे नियोजन सुरू आहे. राज्यात कोविड १९ मुळे मृत्यूचे प्रमाण हे ६० वर्षांखालील नागरिकामध्ये जास्त असल्याचे दिसून येते. त्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांच्या प्रिकॉक्शन डोससाठीच वापरण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर मागणीनुसार लस पोहोचवण्यात येत आहे. एका कूपीमध्ये दोन जणांना डोस दिला जाईल.
चार थेंब टाकणार नाकावाटे
शासनाच्या नव्या सूचनेनुसार ही लस केवळ बुस्टरसाठीच नाही तर पहिला आणि दुसरा डोस घेणाच्यासाठीही राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही अशांनाही कोविडपासून संरक्षणासाठी ही लस घेता येणार आहे. या लसीचे चार-चार थेंब नाकपुडी मध्ये टाकण्यात येतील, पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा दुसरा घ्यावा लागेल. नंतर सहा महिन्यांनी हाच डोस बुस्टर डोस म्हणून दिला जाणार आहे.