छत्रपती संभाजीनगरात भरदुपारी पसरला 'अंधार'!

विजांच्या कडकडाटासह पाऊस
छत्रपती संभाजीनगरात भरदुपारी पसरला    
'अंधार'!

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


शुक्रवारी सकाळच्या सत्रात कडक उन्हाने जीवाची काहिली होत असतानाच अचानक सुसाट्याच्या वाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात ढगांची गर्दी जमायला सुरुवात झाली आणि बघता बघता दुपारच्या एक वाजता शहरभर अंध:कार पसरला. पाऊण तासापासून शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस (rain) सुरू असून त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. 

मराठवाड्यात ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत असून काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अशात मराठवाड्यात आजपासून पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर आजपासून ३० एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही भागात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

असा आहे अंदाज

२७ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

२८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

२९ एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात, तर ३० एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

२८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज परभणीच्या 'वनामकृ' विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com