समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल

शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्याने नुकत्याच झालेल्या पावसात शहरालागतच्या भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या तीन गावातील शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणीकरून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शहरालगतच्या गावात पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचा आढावा व उपाययोजनांबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी तहसीलदार जोती पवार समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, प्रकल्प अधिकारी शंकरा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नुकत्याच झालेल्या पावसात शेजारील गावांतील शेतात पाणी शिरले. पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेजारील गावातील शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले. यापुढील अशा घटना रोखण्यासाठी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने उपाय योजना कराव्यात, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तहसीलदार ज्योती पवार यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे केले असल्याचे सांगितले. या नुकसानीत भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या गावांतील अंदाजे 70 शेतकऱ्यांच्या जवळपास 20 हेक्टर शेतजमीनीवरील फळपीके व कांदापीकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com