
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
शहरात महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमच्या (Marathi and Urdu medium) शाळा (school) आहेत. परंतु, या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशची सुविधा दिली जाणार आहे, असे महानगरपालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित शाळापूर्व तयारी कार्यक्रमात जाहीर केले.
आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुनील डोंगरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले प्रत्येक यशस्वी माणसामागे एक यशस्वी शिक्षकाचे योगदान असते. त्यामुळे शिक्षकांनी आपले विचार उंच ठेवून आणि डोळ्यांसमोर मोठे आदर्श ठेवूनच काम करणे गरजेचे आहे. तेव्हाच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महानगरपालिकेने काही शाळामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यासोबतच आता मराठी आणि उर्दू माध्यमच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिशची सुविधा देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ही सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असेही प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले. तर आयुष्यात चांगले शिक्षकांची आठवण कधीही धूसर होत नाही. मी आज जे काही आहे, त्यात माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, आज स्पर्धेचे युग असून यात टिकण्यासाठी त्या गुणवत्तेचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी भर देणे आवश्यक आहे, असे आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकार्यांसह शिक्षकांची उपस्थिती होती.