Friday, April 26, 2024
HomeUncategorizedधंद्यासाठी दुभाजक फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

धंद्यासाठी दुभाजक फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद- ग्राहकांच्या सेवेसाठी महामार्गावरील दुभाजके फोडून अपघातास कारणीभूत ठरणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी धडाकेबाज कारवाई करत दोन पेट्रोलपंप मालकासह हॉटेल आणि वॉशिंग सेंटर व्यापार्‍यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावरील दोन लेनमधील दुभाजके तोडून ग्राहकांच्या सेवेसाठी शासकीय मालमत्तेचे नुकसान करून कृत्रिम वळण रस्ता तयार केल्याने घडत असलेल्या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया दुभाजक तोडून रस्ता बनविणाऱ्या व्यापार्‍यांविरुद्ध धडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील कन्नड ग्रामीण, रत्नपूर, पाचोड, गंगापूर, करमाड, या पाच पोलीस ठाणे अंतर्गत असलेले हॉटेल व्यावसायिक, दोन पेट्रोलपंप चालक, फॉर्म हाऊस मालक आणि वॉशिंग सेंटर मालकांविरुद्ध कलम ४३१ भादंवि सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम- १९८४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

या गुन्ह्यामध्ये पाच वर्षांपर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे. यात कन्नड हायवेवरील हॉटेल माऊली, हॉटेल शिवराज, हॉटेल अशोक, हॉटेल आबाचा वाडा, हॉटेल श्रीमूर्ती, गर्जे फार्महाऊस आणि हादगाव वॉशिंग सेंटर तसेच खुलताबाद हद्दीतील सज्जपूर ते पळसवाडी या महामार्गावरील हॉटेल आम्रपाली आणि हॉटेल रोहिणी, गंगापूर हद्दीतील ढोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत हॉटेल बटरफ्लाय (जुने कायगाव), हॉटेल लोकसेवक, गांधी पेट्रोलपंप, हॉटेल जिजाऊ, गॅनोज कंपनी, एच.पी. पेट्रोलपंप आणि हॉटेल इंडियन ढाबा तसेच पाचोड हद्दीतील राजापूर, डाभरूळ गावाजवळ आडूळ बायपासजवळ माऊली लॉन्ससमोर दुभाजक तोडणाऱ्या व्यक्तीविरोधात, करमाड हद्दीतील औरंगाबाद ते जालना रोडवर करमाड गावाजवळील रोडवरील दुभाजक तोडणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अपघाताची शक्यता वाढली
औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील दोन मार्गिकांमधील दुभाजके तोडून शासकीय मालमसेचे नुकसान करून कृत्रिम वळण रस्ता तयार केल्याने वाहनचालक या कृत्रिम वळणातून अचानक वळण घेतल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते.

कडक कारवाई करणार
महामार्गावरील दुभाजक तोडणाऱ्या विरोधात सरकारी संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या मार्गावर अशा पद्धतीने दुभाजक तोडून कृत्रिम मार्ग करणाऱ्यांच्या विरोधात अजून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या