Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण तापले

औरंगाबादमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण तापले

औरंगाबाद – aurangabad

ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद शहरात पाच हजाराहून अधिक नागरिकांनी लस न घेता बोगस प्रमाणपत्र काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी तपासणे आता वेग घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी पेपर लिकप्रकरणात औरंगाबादमधील क्लासेसचालक गजाआड झाले असताना आता बोगस कोरोना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट (Corona Vaccination Certificate) प्रकरणाने शहराची मोठी बदनामी होत आहे.  

- Advertisement -

(DKMM College) डीकेएमएम कॉलेजच्या केंद्रात २८ ऑगस्ट रोजी १६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस न घेताच बनावट प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र त्यावर मनपा, जिल्हा प्रशासन, पोलिसांनी कडक कारवाई केलीच नाही. उलट तपासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्यांचे धाडस वाढले असे लक्षात येत आहे. दरम्यान, लस न घेता प्रमाणपत्र घेणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होतील. तशी तयारी सुरू असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला.

एकीकडे शहरातील हजारो लोक रांगा लावून लस घेत असताना काही मंडळी लस न घेताच प्रमाणपत्र पदरात पाडून घेत होती. या गोरखधंद्यातील एक टोळी जिन्सी पोलिसांनी रात्री रंगेहाथ पकडली. जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारीच मास्टरमाइंड असलेल्या या टोळीने किमान ४०० जणांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची कबुली दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतरही अनेक टोळ्या सक्रिय असून जिल्ह्यात ५००० पेक्षा अधिक जणांनी बोगस प्रमाणपत्र मिळवले आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या या ५ हजार जणांना तसेच इतर टोळ्यांना शोधण्याचे कठीण आव्हान सरकारी यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान, मंगळवारी अटक झालेल्या टोळीतील डॉक्टर घाटीचा नसल्याचा दावा प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी केला, तर डॉ.शेख रझीउद्दीन फहीमउद्दीनने (२७) २०१३ मध्ये घाटी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. खातरजमेसाठी घाटी प्रशासनासोबत अधिकृत पत्रव्यवहार करू, असे पोलिसांनी सांगितले. या आरोपीचे दोन भाऊही डॉक्टर असून एकाचे खासगी रुग्णालय आहे. आरोपीला संरक्षण मिळावे यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी संपर्क साधल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

डीकेएमएम प्रकरणात बेगमपुरा पोलिसांनी त्या १६ जणांचा जवाब घेतला. मात्र, या मागचा सूत्रधार कोण आहे हे शोधून काढले नाही. त्यानंतर महिनाभराने म्हणजे २८ सप्टेंबर रोजी जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतदेखील कोरोनाची लस न घेता प्रमाणपत्र मिळवणारे तीन जण सापडले होते. मनपा आरोग्य विभागाने तक्रार दिली होती. मात्र, त्याचा तपासदेखील पुढे सरकला नाही. अखेर याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेकडो बनावट प्रमाणपत्र देणारी मोठी टोळी उघडकीस आली.

नोव्हेंबर महिन्यात सिद्धार्थ उद्यानासमोर आरटीपीसीआर चाचणीमध्ये दोन तरुणांना कोरोना झाल्याचे समोर आले. मात्र, या दोन्ही तरुणांच्या ऐवजी दोन बनावट रुग्ण मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यात (District Hospital) जिल्हा रुग्णालयातील दोन कंत्राटी डॉक्टरांचा सहभागही समोर आला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद आहे. ठोस कारवाई झालेली नाही. एकुणात महापालिकेच्या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घेतल्या नाहीत. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनीही पोलिसांकडे विचारणा करणे टाळले. त्यामुळे टोळ्या फोफावल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या