देशातील सर्वात मोठी शिवलिंगाची प्रतिकृती वेरूळमध्ये!

श्री विश्वकर्मा तीर्थ धामचा प्रकल्प; 2022 मध्ये होणार खुले
देशातील सर्वात मोठी शिवलिंगाची प्रतिकृती वेरूळमध्ये!

वेरूळ- वेरूळमध्ये देशातील सर्वाधिक उंचीच्या शिवलिंगाची प्रतिकृती साकारत आहे. 60 फुटाचे शिवलिंग प्रत्यक्षात एक मंदिर असून याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिष्ठापना होणार आहे. श्री विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात तब्बल 28 वर्षापासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे  काम आता अंतिम टप्प्यात असून 2022 च्या शिवरात्रीपर्यंत ते पूर्ण करण्याचा मानस आहे.

बारा ज्योर्तिलिंगापैकी भीमाशंकर, परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वेरूळचे घृष्णेश्वर असे पाच ज्योर्तिलिंग महाराष्ट्रात आहेत. घृष्णेश्वराच्या दर्शनासह लेणी बघायला येणाऱ्या पर्यटकांची वर्षभर वेरूळमध्ये गर्दी असते. त्यांना एका ठिकाणी 12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन घडावे आणि पर्यटकांसाठी एक नवीन ठिकाण तयार व्हावे या हेतूने या मंदीराची उभारणी केल्याचे श्री विश्वकर्मा तीर्थधामचे महेंद्र बापू यांनी सांगितले. महेंद्र बापू गुजरातच्या बडोदा जिल्ह्यातील चानोंदचे असून त्याच्या देखरेखीखाली काम सुरू आहे.

भव्य मंदिराची उभारणी

वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर श्री विश्वकर्मा तीर्थधाम असून येथे भगवान श्री विश्वकर्माचे मंदिर आहे. या परिसरात बारा ज्योर्तिलिंग मंदिराचे काम सुरू आहे. मंदीराचा परिसर 108 बाय 108 फुट आकाराचा आहे. जमिनीपासून शिवलिंगाची उंची 60 फुट तर मंदीराच्या छतापासून 40 फुट आहे. शाळुंका 38 फुट रूंद आहे. पावसाळ्यात पिंडेवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य नयनरम्य ठरेल. पिंडीसह संपूर्ण मंदिराचा रंग काळा असेल, असे महेंद्र बापू म्हणाले.

एका ठिकाणी १२ ज्योर्तिलिंग

मंदिराच्या गाभाऱ्यात भारताच्या नकाशावर 12 शहरात असणाऱ्या 12 ज्योर्तिलिंगांची प्रतिष्ठापना केली जाईल. ज्योर्तिलिंग तयार करण्याचे काम उज्जेन येथे सुरू आहे. मूळ ज्योर्तिलिंग आहे, त्याचा आकाराचे हे शिवलिंग असतील. नकाशाभोवती रिंगणात एकाच वेळी 12 पिंडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग आहे.

महाशिवरात्रीला खुले होणार

मंदिराच्या कामाला 1995 मध्ये सुरूवात झाली होती. सुरुवातीला 108 फुटाच्या शिवलिंगाची योजना होती. निधीअभावी 1999 मध्ये काम बंद पडले. गेल्या वर्षी जुनमध्ये कामाला वेग आला. महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी खुले होईल. हे मंदीर देशातील शिवलिंगाची सर्वात मोठी प्रतिकृती ठरेल.

-महेंद्र बापू, श्री विश्वकर्मा तीर्थ धाम, वेरूळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com