केंद्रीय पथक येताच कन्टेनमेंट झोनमध्ये झळकले बॅनर

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

चार दिवसांपूर्वी महापालिकेने शहरात कोरोना संसर्गाने बाधित असलेले शहरातील 26 भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले. मात्र या भागात कन्टेनमेंट झोन-प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर्स लावण्यात आलेले नव्हते. गुरूवारी दि.8 केंद्रीय पथक शहरात दाखल होत असतानाच पालिकेने सर्व भागांत तात्काळ कर्मचार्‍यांकरवी बॅनर्स लावले. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना बाहेर जाण्यास व बाहेरील व्यक्तींना आत येण्यास मनाई आहे, यावर देखरेख ठेवणारी कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित नसून नागरिक सर्रासपणे ये-जा करताना दिसून आले.

कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने राज्य सरकाने बाधित वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून निश्चित करून त्या त्या भागात प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पालिकेने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टीमकडून शहरातील कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार रविवारी दि.4 एप्रिल रोजी पालिकेने शहरात 26 कन्टेनमेंट झोन जाहीर केले. यात कोरोनाचे बिग हॉटस्पॉट म्हणून 8 भाग, मध्यम कन्टेनमेंट झोन म्हणून 12 आणि मायक्रो झोनमध्ये 6 वसाहतींचा समावेश आहे. कन्टेनमेंट झोन निश्चित केल्यानंतर या भागात गतवर्षीप्रमाणे पत्रे न लावता बॅनर्स व पोस्टर्स लावून हे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आरक्षित केले जाणार असून आतील नागरिकांना बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना आत येण्यावर निर्बंध घातले जाणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी जाहीर केले होते. मात्र कन्टेनमेंट झोन जाहीर करून तीन दिवस उलटूनही बॅनर्स लावण्यात आले नव्हते. गुरूवारी कोरोनाची येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक शहरात येणार असल्याचे कळताच पालिकेने कन्टेनमेंट झोनमध्ये बॅनर्स लावले. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *