Vaccination आता दररोज पासवर्ड बदलणार

बोगस लसीकरण प्रमाणपत्र रोखणार
Vaccination आता दररोज पासवर्ड बदलणार

औरंगाबाद - Aurangabad

महापालिकेच्या आसेफिया कॉलनीतील बायजीपुरा आरोग्य केंद्रात (corona) कोरोना लस (Vaccination) न घेता परस्पर ऑनलाईन प्रमाणपत्र (Certificate online) मिळवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. पालिकेने याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार देखील दिली आहे. तसेच आता लस न घेताच ऑनलाईन कोरोना प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रकार रोखण्यासाठी आरोग्य अधिकार्‍यांना दररोज पासवर्ड बदलून दिला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली.

महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर 16 जणांनी लस न घेताच प्रमाणपत्रासाठी लस घेतल्याची नोंदणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची चौकशी सुरू असतानाच मंगळवारी बायजीपुरा आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात असताना सकाळी या केंद्रावर 20 जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. मात्र कोविन ऍपवर 23 जणांची नोंद झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीत तीनपैकी दोघांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याचे लक्षात आले. मात्र तिसर्‍याचे प्रमाणपत्र रद्द करून आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना कळवण्यात आले. डॉ. मंडलेचा यांनी लगेच आरोग्य केंद्रात जाऊन चौकशी केली.

नोंदणीवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर तिघांशी संपर्क केला. तेव्हा दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर याप्रकरणी जिन्सी ठाण्यात शैलजा साठे यांनी तक्रार दिली. या संदर्भात माहिती देताना डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, बायजीपुरा आरोग्य केंद्रात लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लसीकरणाच्या प्रमुख म्हणून डॉ. नळणीकर यांना सायबर गुन्हे शाखेत तक्रार देण्याची सूचना केलेली आहे. तसेच वारंवार असे प्रकार घडू नये, अशा प्रकारांना आळा बसवा यासाठी आता डाटा ऑपरेटर यांना देण्यात येणारा (Password) पासवर्ड आरोग्य अधिकार्‍यांना देऊन तो वारंवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य अधिकार्‍यांकडून हा पासवर्ड डाटा ऑपरेटर यांना दिल्यानंतरच ऍपव्दारे लसीकरणाची नोंदणी करता येईल. त्यामुळे पासवर्डची माहिती फक्त आरोग्य अधिकारी आणि डाटा ऑपरेटर यांच्याकडेच राहणार आहे. लस न घेताच ऍपव्दारे लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रकारांना यामुळे आळा बसेल, असा दावा डॉ. मंडलेचा यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com