सार्वजनिक वाहन चालवताना चालकाने मास्क वापरणे बंधनकारक

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
सार्वजनिक वाहन चालवताना चालकाने मास्क वापरणे बंधनकारक

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व प्रकारची सार्वजनिक वाहने चालवतांना प्रत्येक वाहन चालकाने मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक आहे.

सदरील नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली , त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री चव्हाण यांनी विना मास्क सार्वजनिक वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याबाबत संबंधितांना सूचित केले. सदरील नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुध्द प्रथम गुन्ह्याकरीता (30) दिवस तर दुसऱ्या गुन्ह्याकरीता (90) दिवस परवाना निलंबन होईल तर तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

तसेच केंद्रशासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपुष्टात आली असेल, अशा वाहनविषयक दस्ताऐवजांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यत वाढवलेली आहे

. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधीकरण औरंगाबाद यांनी परवाना धारकांच्या परवाना नुतनीकरणाची ,बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्ताऐवजांच्या वैधतेस केंदशासनाकडून निर्देशित करण्यात आलेल्या 31 डिसेंबर 2020 या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com